Vaishnavi Hagawane Case: पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण समोर आल्यानंतर महाराष्ट्रभरात याची चर्चा सुरु झाली. आपण आज 21 शतकात जगताना महिला-पुरुष एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्याचे सांगतो. पण दुसरीकडे मुलीला नांदवण्यासाठी सासरच्यांकडून हुंडा घेतला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. वैष्णवीच्या सासरच्या मंडळींबद्दल एकामागोमाग एक धक्कादायक माहिती समोर येतेय. एका जुन्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेटकरी वैष्णवीचा दीर सुशील हगवणेला ट्रोल करताना दिसतायत. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
हुंड्याच्या हव्यासापायी हगवणे कुटुंबीयांनी सून वैष्णवीला अमानवी वागणूक दिल्याचे उघड झालंय. पण वैष्णवीचा दीर सुशील हगवणे काही दिवसांपुर्वी सोशल मीडियात लोकांना ब्रम्हज्ञान सांगत होता. त्यामुळे 'लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वत: कोरडे पाषाण' अशी हगवणे कुटुंबाची अवस्था असल्याचं समोर आलंय.
वैष्णवीचा दीर सुशील हगवणेची एक सोशल मिडिया पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली आहे. बारामती लोकसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत पाहायला मिळाली. नणंद विरूध्द भावजय अशी ही लढत चांगलीच चर्चेत आली. लोकसभा निवडणुकीत सुशील हगवणे हा सुनेत्रा पवारांचा प्रचार करत होता. त्यावेळी त्यानं सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी इन्स्टाग्रामवरती पोस्ट केली होती.
सुशील हगवणेने पवारा कुटुंबीयांच्या सुनेच्या प्राचारार्थ एक पोस्ट केली.'यावेळी लेकीला नाही तर सुनेला निवडून आणुया....सूना घराबाहेर पडल्या तर स्वतःचं साम्राज्य पण उभारू शकतात, सूना सुद्धा इतिहास घडवू शकतात हे जगाला दाखवून देऊया.... एक मत सुनेसाठी,' अशी पोस्ट सुशील हगवणे याने केली होती. पण प्रत्यक्षात आपल्या परिवारातील सुनेला हगवणे कुटुंबीयांनी अमानवी वागणूक दिली. त्यामुळेच वैष्णवीला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले. तर त्याआधी एक सून घर सोडून गेली होती. त्यामुळे नेटकरी सुशील हगवणेच्या पोस्टवर राग व्यक्त करतायत.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर मराठा समाजातील बांधवाची महत्वाची बैठक पार पडली. यात महत्वाचे निर्णय घेण्यात आले. पुण्यातला मराठा समाज यापुढे कोणताही रोटी बेटी व्यवहार करणार नाही, असा ठराव घेण्यात आला आहे. लग्न करताना काही तरी आचारसंहिता असावी असं मत मांडण्यात आलं. समाज म्हणून आपल्याला या ठिकाणी एकत्र यावे लागेल. मुहूर्तावर लग्न लागत नाही, ते वेळेवर लागेल याचा प्रयत्न केला पाहिजे असंही सांगण्यात आलं. मराठा समाजात धाक नाही. मराठा समाजाने परीक्षण करण्याची गरज आहे. समाजाची बदनामी होते आहे. जाणीव पूर्वक मराठा समाज टार्गेट होतो आहे का? विशिष्ट एका पक्षाला, जातीला टार्गेट करण्याचा प्रयत्न होत आहे. मराठा समाज हगवणे यांनी केलेल्या कृत्याचं समर्थन करणार नाही. ही जी घटना झाली एका समाजातच होत नाही, सर्व समाजात ही वृत्ती आहे. समाजाला टार्गेट करायंच्यागे काम चालू आहे अशी खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.
लग्नाचे प्रदर्शन होत आहे. मराठा समाज मस्तवाल आहेत असे चित्र उभे केले जाते. राजकीय मराठी लोकांनी पक्षाची कवाडे बाजूला ठेवून एकत्रित आले पाहिजे. समाज संस्था म्हणून आपण काम केलं पाहिजे. मीडियातून मराठा समाजाची सध्या बदनामी सुरू आहे आचारसंहिता करताना सुनांनी कसं वागायचं, नंदाने कस वागायचं हे शिकवा. विश्वास व्यक्त करायला हवा मुलीला शिकवा. तिला स्वतःच्या पायावर उभे करा असं सांगण्यात आलं.