Vaishnavi Family Press Conference: माझ्या मुलीचा मोबाईल काढून घेतला असं म्हणत आहेत. मीच तिला आणि आरोपीला 1 लाख 52 हजारांचा मोबाईल दोन-तीन महिन्यापूर्वी घेऊन दिला होता असा खुलासा वैष्णवी हगवणेचे वडील अनिल कस्पटे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी बिल दाखवत हगवणे कुटुंबाला उघडं पाडलं. तसंच आपण आजही त्या मोबाईलचे हफ्ते भरत असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
"माझ्या मुलीचा मोबाईल काढून घेतला असं म्हणत आहेत. मीच तिला आणि आरोपीला 1 लाख 52 हजारांचा मोबाईल दोन-तीन महिन्यापूर्वी घेऊन दिला होता. माझी मुलगी माझ्या घरी होती. वाकडच्या क्रोमात तिला बोलावून घेतलं होतं. मला पप्पाकडून मोबाईल घेऊन दे असं सांगितलं. मुलीने मला फोन केला, त्याचा रेकॉर्डही आहे. 18-9-2024 ला मोबाईल घेऊन दिला होता. त्याचे आजही हफ्ते भरत आहेत," असा खुलासा अनिल कस्पटे यांनी केला.
पुढे ते म्हणाले की, "मी एमजी हेक्टर गाडी बूक केली होती. वाकड हायवे शोरुमला गाडी बूक केली होती. 50 हजार डिपॉझिट भरंल होतं. त्यांनी त्यावरुनही माझ्याशी वाद घातला. ही जर गाडी दिली तर ती गाडी सोडून देईन नाहीतर पेटवून देईन, मला फॉर्च्यूनर गाडीच पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं". त्याचीही पावती यावेळी त्यांनी दाखवली.
हगवणे कुटुंबाचा आमच्याकडे अनेक गाड्या असल्याचा दावा फेटाळून लावत ते म्हणाले की, "त्यांच्याकडे एकच गाडी आहे. जी गाडी आहे ती दुसऱ्या व्यक्तीची आहे. मी जी गाडी दिली आहे, ती मागितली होती. माझ्या मुलीचा छळ केला. लग्न मोडून टाकेन, लग्नात उभं राहणार नाही अशा धमक्या दिल्या. आधी माझ्या मुलीचं लग्न दोनवेळा मोडलं होतं. हे लग्न मला जबरदस्तीने करावं लागलं. लग्नाला तयार झाल्यावर त्यांनी अशी मानसिकता करुन ठेवली. माझ्याकडे सोनं, चांदी, गाडी, गौरीची मागणी केली. फॉर्च्यूनर गाडीसाठी हगवणेंनी आग्रह धरला होता". Dनिल कस्पटे यांनी हगवणे यांच्या गाड्या कोणाच्या नावावर आहेत हे दाखवणारी कागदपत्रे दाखवली.
"अधिक महिन्यात चांदीचंच ताट पाहिजे होतं. तीदेखील मागणी मी पूर्ण केली. जावयाला स्टील किंवा तांब्याचं ताट देतात. पण यांना चांदीचं हवं होतं," असंही त्यांनी सांगितलं. तसंच निलेश चव्हाणही या कटात सामील आहे असं मी ठामपणे सांगत असल्याचं म्हटलं.
"जर सून मयत नसेल तर बाळाला सांभाळायला द्यायचं हे कसं सुचलं. निलेश चव्हाण तिथे कसा होता? निलेश चव्हाणही या कटात सामील आहे असं मी ठामपणे सांगतो. बाळ घऱाच्या तर बाहेर नव्हतं, वैष्णवीच्या जवळ होतं. माझी मानसिकता नव्हती, त्यामुळे मी भावाला पाठवलं होतं," असं त्यांनी सांगितलं.
सुपेकर जालिंदर यांचं मामा म्हणून नाव आहे. मामाच्या जीवावर काहीही करु शकतो असं त्यांनी धमकावलं होतं. दोन कोटी रुपये न दिल्याने धमकी देऊन गेले होते असाही खुलासा त्यांनी केला आहे.