Ajit Pawar Meet Vaishnavi Hagwane Family: पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत असतानाच शुक्रवारी पुणे पोलिसांनी या प्रकरणातील फरार आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक केली. सदर प्रकरणाला राजकीय पार्श्वभूमी असल्याची टीका वारंवार होत असून मुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं जात आहे. अजित पवार तसेच त्यांच्या पक्षाने या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचं जाहीर केलं आहे. असं असतानाच एकीकडे पोलीस तपास सुरु असून दुसरीकडे वेगवेगळ्या राजकीय पक्षातील नेतेमंडळी आता वैष्णवीच्या आई वडिलांची भेट घेताना दिसत आहेत. शुक्रवारी सायंकाळी स्वत: अजित पवार वैष्णवीच्या पालकांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. यावेळी काय बोलणं झालं याबद्दलची माहिती त्यांनीच आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून दिली आहे.
"पुण्यातील वाकड येथे अनिल कस्पटे आणि कुटुंबीयांची आज त्यांच्या राहत्या घरी भेट घेतली. या दुःखद प्रसंगी त्यांच्याशी सहवेदना व्यक्त केल्या आणि त्यांचं सांत्वन केलं. कस्पटे कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या भावना मन हेलावून टाकणाऱ्या होत्या. आपल्या लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी माझ्याकडून सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांना मी यावेळी दिली," असं अजित पवारांनी या भेटीचा तपशील देताना आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन म्हटलं आहे.
"वैष्णवीला परत आणणे शक्य नाही, मात्र तिला, मानसिक वा शारीरिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर कठोरातील कठोर कार्यवाही करणे निश्चितच शक्य आहे, याची ग्वाही दिली. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या कुणाचीही गय करू नये, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला आधीच दिल्या आहेत. तसेच या प्रकरणाची जलद सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत घेण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधून तातडीनं आदेश देण्यात येतील, हेही स्पष्ट केले," असा उल्लेखही अजित पवारांच्या पोस्टमध्ये आहे.
"या कठीण काळात आम्ही सर्व खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहोत, कुठलीही चिंता करू नका. न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवा, आपल्याला नक्की न्याय मिळेल, असे आश्वासित केले. तसंच वैष्णवीच्या लहान बाळाच्या उज्वल भविष्यासाठी तुमच्यासह आमचीदेखील तितकीच जबाबदारी राहील, याचा विश्वास दिला," असंही अजित पवारांनी भेटीमधील चर्चेबद्दलचा तपशील देताना सांगितलं.
पुण्यातील वाकड येथे श्री. अनिल कस्पटे आणि कुटुंबीयांची आज त्यांच्या राहत्या घरी भेट घेतली. या दुःखद प्रसंगी त्यांच्याशी सहवेदना व्यक्त केल्या आणि त्यांचं सांत्वन केलं. कस्पटे कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या भावना मन हेलावून टाकणाऱ्या होत्या. आपल्या लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 23, 2025
दरम्यान, काल सायंकाळी भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनीही वैष्णवीच्या पालकांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. यावेळेस गिरीश महाजन यांच्या फोनवरुन वैष्णवीच्या पालकांनी मुख्यमंत्री फडणवीसांबरोबर संवाद साधला. वैष्णवीच्या पालकांनी मुख्यमंत्र्यांकडे दोन प्रमुख मागण्या केल्या. आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करावी आणि विशेष सरकारी वकील म्हणून राजेश कावेडिया यांची नियुक्ती करण्याची मागणी अनिल कस्पटे यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन बोलताना केली. त्यावर, वकिलासंदर्भातील मागणी मुख्यमंत्र्यांनी लगेच मान्य केली.