Vaishnavi Hagwane Suicide Rupali Chakankar: महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन वैष्णवी हगवणे प्रकरणासंदर्भात महिला आयोगाची भूमिका स्पष्ट केली. महिला आयोगाने नेमकं काय काम केलं याबद्दल भाष्य करताना रुपाली चाकणकरांनी वैयक्तिक टीका करणाऱ्यांनाही टोला लगावला आहे.
"वैष्णवीच्या आई-वडिलांकडे बाळ राज्य महिला आयोगाकडूनच्या माध्यमातून वैष्णवीच्या आई-वडिलांकडे देण्यात आलं आहे," अशी माहिती रुपाली चाकणकरांनी दिली. तसेच पुढे बोलताना करिष्मा हगवणेने महिला आयोगाकडे तक्रार केल्याची माहितीही रुपाली चाकणकरांनी दिली. "6 नोव्हेंबर 2011 ला करिष्मा हगवणेने आमच्याकडे तक्रार केली. त्याच दिवशी मयुरीच्या (मोठी सून) भावाने (मेघराज जगताप) यानेही महिला आयोगाकडे तक्रार केली. त्या तक्रारी पोलिसांकडे पाठविण्यात आल्या. त्यानुसार 7 नोव्हेंबर ला बावधन पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. हा कौटुंबिक वाद होता, त्यामुळं समुपदेशन करुन हा वाद मिटविण्याचा हेतू होता," असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.
मात्र त्याचवेळी रुपाली चाकणकरांनी, "वैष्णवीसंदर्भात महिला आयोगाकडे कोणतीही तक्रार आली नव्हती," असं स्पष्ट केलं आहे. "पोलिसांनी या प्रकरणी उत्तम तपास केलाय, बाळाला ही वैष्णवीच्या आई-वडिलांकडे सुखरुप सोपवलं आहे," असं म्हणत चाकणकरांनी पोलीसांचं कौतुक केलं. "आपल्याकडे कठोर कायदे आहेत, पण ते मोडले जातात. मग तो हुंडाबळीचा कायदा असो की गर्भलिंगनिदान चाचणीचा कायदा असो, यासाठी पळवाटा शोधल्या जातात," अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
रोहिणी खडसेंनी रुपाली चाकणकरांवर निशाणा साधताना, "महिला आयोगाकडे तक्रार नियोजन केले होते तर त्यांनी काय केले? महिला आयोगाच्या अध्यक्षांना पक्षाच्या कार्यक्रमाला वेळ मिळतो. महिला आयोग 24 तास वेळ देईल अशाच व्यक्तीला अध्यक्ष करावं. आत्ताच्या महिला आयोगाचे अध्यक्ष प्राणिक जबाबदार आहे. त्यामुळे त्यांना वेळ मिळत नसेल. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे महिला आयोगाचे पद नसावं. महिला आयोगाच्या अध्यक्षांनी वेळेवर दखल घेतली असती तर वैष्णवी जिवंत असती," असं म्हटलं आहे.
या टीकेबरोबरच, "पुणे येथील वैष्णवी हगवणे यांनी सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याचे वृत्त दुर्दैवी आहे. हुंड्यासारखी प्रथा आजही आपल्या समाजात कायम असणे ही शरमेची बाब आहे. वैष्णवी यांचे सासरे हे अजित पवार गटाचे तालुकाप्रमुख होते. या घटनेनंतर ते फरार आहेत. कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडता तसेच कुणालाही पाठीशी न घातला त्यांना त्वरित पकडण्याची तसेच निष्पक्ष चौकशीची मागणी मी या माध्यमातून करते. या राज्यात लाडक्या बहीण सुरक्षित नसतील, त्या शोषणाच्या बळी ठरत असताना शासन बघ्याची भूमिका घेणार असतील तर ही सुद्धा शरमेची बाब आहे," असं यशोमती ठाकुरांनी केलेल्या ट्विटमध्ये रुपाली चाकणकरांना टॅग करुन म्हटलं होतं. या टीकेलाही रुपाली चाकणकरांनी पत्रकार परिषदेमधून उत्तर दिलं आहे.
पुणे येथील वैष्णवी हगवणे यांनी सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याचे वृत्त दुर्दैवी आहे. हुंड्यासारखी प्रथा आजही आपल्या समाजात कायम असणे ही शरमेची बाब आहे. वैष्णवी यांचे सासरे हे अजित पवार गटाचे तालुकाप्रमुख होते. या घटनेनंतर ते फरार आहेत. कोणत्याही राजकीय… pic.twitter.com/jEWJhWtNJD
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) May 22, 2025
"गेल्या दोन दिवसांत चिल्लरचा खूप आवाज आला, म्हणून मी आयोगाचा लेखाजोखा मांडला," असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. तसेच यशोमती ठाकुरांनी केलेल्या टीकेवरुन पलटवार करताना, "वैयक्तिक टिकेची उत्तर मला ही देता येतात, पण माझ्यावर ते संस्कार नाहीत," असा टोला रुपाली चाकणकरांनी लगावला.
"विरोधकांना आमच्यावर टीका केल्यावर प्रसिद्धी मिळते. मी सुमोटो दाखल केल्याचं विरोधकांना कल्पना नसावी. महिला आयोग केवळ संबंधित विभागाला सूचना पाठवण्याचे ते काम आहे. त्यानुसार पोलिसांकडे तक्रार गेली अन् मग एफआयआर झाली. त्यापुढं तपास करायचं काम त्यांचं असतं. एक विभाग एकचं काम करु शकतो," असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.
"मयुरी हगवणे प्रकरणात चार्जशीट दाखल झालं नाही, हे गंभीर आहे. मी मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत चर्चा करणार आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये पौड पोलीस स्टेशनचा भाग पुणे ग्रामीण मध्ये होता, आता तो भाग पिंपरी चिंचवड भागात आहे," असंही म्हटलं आहे.