Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Vaishnavi Hagwane Case: वैष्णवीच्या आत्महत्येनंतर 8 दिवसांनी राजेंद्र हगवणेला अटक; CCTV फुटेज समोर

Vaishnavi Hagwane Case Rajendra Hagawane Arrested: सून वैष्णवी हवगणे हिने आत्महत्या केल्यानंतर आठ दिवसांनी पोलिसांना सापडला राजेंद्र हगवणे आणि त्याचा थोरला मुलगा

Vaishnavi Hagwane Case: वैष्णवीच्या आत्महत्येनंतर 8 दिवसांनी राजेंद्र हगवणेला अटक; CCTV फुटेज समोर

Vaishnavi Hagwane Case Rajendra Hagawane Arrested: संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फरार असलेल्या राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर 8 दिवसांनी या प्रकरणामध्ये पोलिसांनी वैष्णवीच्या सासऱ्याला आणि दिराला अटक केली आहे. या प्रकरणावरुन राज्यातील राजकारण चांगलेचं तापल्याचं चित्र पाहायला मिळलं. राजेंद्र हगवणे हा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष आहे. त्यामुळेच या प्रकरणावरुन थेट अजित पवार आणि त्यांच्या पक्षावर टीका होताना दिसली. मात्र यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना अजित पवारांनी या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसून राजेंद्र हगवणेच्या मागावर पोलिसांच्या तीन टीम पाठवण्यात आल्या आहेत असं गुरुवारी बारामतीमधील जाहीर सभेत सांगितलं होतं. 

सीसीटीव्ही फुटेज समोर

मुळशीमधील हगवणे कुटुंबातील वैष्णवीने लग्नाला दोन वर्ष पूर्ण होण्याआधीच सासरच्या व्यक्तींच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ केला जायचा असं तिच्या आई-वडिलांनी म्हटलं आहे. वैष्णवीला 9 महिन्यांचा मुलगा असून या मुलाचा ताबा कोणाकडे द्यायचा यावरुनही मागील काही दिवसांपासून मोठा वाद निर्माण झालेला. या प्रकरणामध्ये थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालत मुलाचा ताबा वैष्णवीच्या आई-वडिलांकडे देण्याचे निर्देश दिल्यानंतर गुरुवारी सायंकाळी या मुलाला वैष्णवीच्या आई-वडिलांकडे सोपवण्यात आलं. दरम्यान, राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या थोरल्या मुलाला अटक करण्याआधीचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे.  

अजित पवार म्हणालेले, कुठे पळून जातो?

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाशी आपला काहीच संबंध नसल्याचं अजित पवारांनी गुरुवारी स्पष्ट केलं होतं. बारामतीमधील जाहीरसभेतील भाषणामध्ये अजित पवारांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणासंदर्भात माहिती मिळताच कारवाई करण्याचे आदेश दिलेलं असं सांगितलं. "मला कळताच मी पोलिसांना सांगितले, अॅक्शन घ्या. सगळे अटकेत आहेत सासरा पळून गेला. पळून पळून जातो कुठं?" असा सवाल करत अजित पवारांनी केला होता. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी राजेंद्र हगवणेला अटक झाली आहे. 

एकूण पाच जण अटकेत

या प्रकरणामध्ये आधीपासूनच वैष्णवीची सासू, नवरा आणि नणंद अटकेत आहे. या तिघांनाही पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आलं असून वैष्णवीच्या सासऱ्याला आणि दिरालाही आता अटक करण्यात आली आहे. 

हुंड्यासाठी छळ

वैष्णवीचा हुंड्यासाठी अमानुष छळ केल्याचा सासरे राजेंद्र हगवणेसह सासू, पती, दिर आणि नणंद यांच्यावर आरोप आहे. शशांकबरोबर वैष्णवीचा प्रेमविवाह झाला होता. लग्नाच्या वेळी हगवणे कुटुंबाला वैष्णवीच्या आई-वडिलांनी 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी अन चांदीची भांडी दिली होती. तरी जमीन खरेदीसाठी 2 कोटींच्या मागणीचा तगादा लावला होता. तसंच पती शशांक हा चारित्र्यावरून संशयही घेत होता. वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक छळ केल्यानं राजेंद्र हगवणेंची लहान सून वैष्णवीचा जीव गेला.

Read More