Hagwane Family Income Details: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये रोज नवीन माहिती समोर येत आहे. राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या कुटुंबियांना कोट्यवधी रुपयांचा हुंडा घेऊनही पैशांच्या हव्यासापोटी वैष्णवीचा छळ केला. याच छळाला कंटाळून अवघ्या 9 महिन्यांच्या लेकराला मागे सोडून वैष्णवीने जगाचा निरोप घेतला. या प्रकरणामध्ये वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे, पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, दीर सुशील हगवणे, नणंद करिश्मा हगवणे या पाच जणांना अटक केली आहे. मुळशीजवळ असलेल्या भुकूम गावात राहणाऱ्या हगवणे कुटुंबाची सध्या राज्यभरात नकोत्या कारणाने चर्चा आहे. मात्र पैशांसाठी दोन्ही सुनांचा छळ करणाऱ्या आणि धाकट्या सुनेच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या हगवणे कुटुंबाच्या कमाईचा स्रोत काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर तिच्या लग्नातील व्हिडीओ समोर आले असून कोट्यवधी रुपये खर्च करुन हगवणे कुटुंबाला कस्पटे कुटुंबियांनी आपली लेक सोपवली. या लग्नाचा थाट व्हिडीओमधूनच अधोरेखित होत आहे. लग्नाला अगदी विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवारांचीही हजेरी होती. अजित पवारांच्या हस्तेच कस्पटे कुटुंबाने 'भेट' दिलेले फॉर्च्युनर कारची चावी नवरदेव शशांककडे सोपवण्यात आल्याचे फोटोही समोर आले. केवळ ही कोट्यवधींची कारच नाही तर कस्पटे कुटुंबाने लेकीला निरोप देताना हुंडा म्हणून बऱ्याच महागड्या वस्तू दिल्या.
वैष्णवी आणि शशांकचा प्रेमविवाह झाला होता. मुलीच्या मनाप्रमाणे लग्न लवून देताना वैष्णवीच्या आई-वडिलांनी हगवणे कुटुंबाला 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी अन् 7 किलो वजनाची चांदीची भांडी दिली होती. तरी जमीन खरेदीसाठी 2 कोटींच्या मागणीचा तगादा हगवणे कुटुंबाने लावला होता. वैष्णवीच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांच्या कालावधीमध्ये अनेकदा वैष्णवीला केवळ पैशांची मागणी करण्यासाठी हगवणे कुटुंबाकडून माहेरी पाठवलं जायचं. दर वेळेस 50 हजार 75 हजार रुपये आम्ही द्यायचो. मागील महिन्यातच शशांकला दीड लाखांचा फोनही घेऊन दिल्याचं वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलं.
नक्की वाचा >> ...तर वैष्णवी हगवणेचा जीव वाचला असता! 'मुलीच्या छातीला सासऱ्याने...', 'त्या' पत्रातून खुलासा
मात्र पैशांची इतकी हाव असलेलं हगवणे कुटुंब नेमकं काय करायचं असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर हगवणे कुटुंबाकडे अनेक मार्गांनी पैसा येत होता अशी माहिती समोर येत आहे. नेमकी त्यांच्या उत्पन्नाची साधणं कोणती होती ते पाहूयात...
> राजेंद्र हगवणे राजकारणात सक्रिय असून तो अनेक निवडणुकाही लढला आहे. त्याला कधीच यश मिळालं नाही. मात्र राजकीय पक्षाशीसंबंधित असल्याने त्याचा गावात दबदबा होता.
नक्की वाचा >> लव्ह मॅरेज, कारच्या चावीचं गुपित, 'त्या बडव्याची..' अन्..; अजित पवारांनी मांडले वैष्णवी हगवणे प्रकरणाचे 12 मुद्दे
> शशांक आणि सुशील हे दोघे भाऊ बांधकाम व्यवसायात होते. या प्रकरणामध्ये फरार असलेला हगवणे कुटुंबाचा निकटवर्तीय निलेश चव्हाण हा सुद्धा बांधकाम व्यवसायातच सक्रीय आहे.
> हगवणेची दोन्ही मुलं वडिलांप्रमाणे राजकारणातही सक्रिय होती. त्यामुळे या माध्यमातूनही त्यांच्याकडे पैशाचा ओघ सुरु होता.
> शेती आणि वॉशिंग सेंटर हा हगवणे कुटुंबाच्या कमाईचा मुख्य स्रोत आहे.
> करिष्मा हगवणे ही फॅशन डिझायनर आहे. पुण्यातील कोथरूड येथे करिष्मा हगवणेचे कपड्यांचे दुकान आहे.