Pune loksabha Election 2024 : पुण्यातील लोकसभा निवडणुकीत आता मोठा ट्विस्ट आल्याचं पहायला मिळतंय. वंचित बहुजन आघाडीकडून पुण्याच्या जागेवर वसंत मोरे (Vasant More) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुण्यात तिरंगी लढत होणार आहे. भाजपकडून मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), तर काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी दिली गेली आहे. तर आता वसंत मोरे यांनी देखील दंड थोपटल्याने पुण्यातील लोकसभेची लढत अधिक चुरशीची होणार आहे. वंचितने पाच उमेदवारांची यादी (Vanchit candidate List) जाहीर केली. बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात वंचित उमेदवार देणार नाही, अशी घोषणा देखील केली आहे. बारामतीत शरद पवार गटाला वंचितचा पाठिंबा असल्याचं देखील जाहीर केलंय.
वंचितकडून जाहीर झालेल्या यादीत नांदेडच्या जागेवर अविनाश भोसीकर यांना उमेदवारी दिलीये. तर परभणीतून बाबासाहेब उगले यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) मधून अफसर खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर शिरूरमधून वंचितने मंगलदास बांदल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.
The Vanchit Bahujan Aaghadi is pleased to declare its third list of candidates from Maharashtra for the Lok Sabha elections.
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) April 2, 2024
The VBA State Committee has decided to support the candidate of Nationalist Congress Party (Sharadchandra Pawar) from Baramati. pic.twitter.com/y587dUqLle
पुण्यात तिरंगी लढत
पुण्यातली सध्याची लढाई ही भाजपच्या मुरलीधर मोहोळ आणि मविआच्या रवींद्र धंगेकरांमध्ये होती. आता यात वसंत मोरे यांची एन्ट्री झाली आहे. तिघंही पुणे महापालिकेत नगरसेवक होते. मुरलीधर मोहोळ नंतर महापौर झाले. तर, रवींद्र धंगेकर गटनेते होते. तर वसंत मोरे यांना मागील विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. रवींद्र धंगेकरांनी नंतर कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव करत आमदारकी पटकावली. मात्र, वसंत मोरे यांना नगरसेवकाच्या वर जाता आलं नाही. मात्र, मनसेला रामराम ठोकून वसंत मोरे यांनी शड्डू ठोकले होते.
दरम्यान, वसंत मोरे यांनी पुण्यात पार पडलेल्या मराठा समाजाच्या बैठकीला उपस्थिती लावली होती. त्यानंतर त्यांनी जरांगे पाटील यांची देखील भेट घेतली. मराठा समाजाच्यादृष्टीने पुणे लोकसभेत वसंत मोरे हे ताकदीचा उमेदवार ठरु शकतात, तर आता वंचितची साथ मिळाल्याने वसंत मोरे यांची ताकद दुप्पट झाली आहे. त्यामुळे आता वसंत मोरे पुण्यात भाजप आणि काँग्रेससाठी डोकेदुखी ठरतील, हे मात्र निश्चित झालं आहे.