Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

कॉलेजमध्ये मराठी बोलल्यावरुन वाद, मराठी विद्यार्थ्याला लाथा बुक्यांसह हॉकी स्टिकने मारहाण, वाशीतील प्रकार

Vashi Crime News: मराठी - अमराठीच्या वादात मराठी विद्यार्थ्याला लाथा बुक्यांसह हॉकी स्टिकने मारहाण झाल्याची घटना वाशीत घडली आहे.

कॉलेजमध्ये मराठी बोलल्यावरुन वाद, मराठी विद्यार्थ्याला लाथा बुक्यांसह हॉकी स्टिकने मारहाण, वाशीतील प्रकार

Vashi Crime News: राज्यात मराठी-अमराठीचा वाद चांगलाच रंगला आहे. कल्याण येथील खासगी रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट तरुणीला एका परप्रांतीय तरुणाने मारहाण केल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. त्यानंतर वाशीमध्येही असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. मराठी-अमराठी वादात मराठी विद्यार्थ्याला लाथा-बुक्क्याने व हॉकी स्टिकने मारहाण झाल्याची घटना वाशीत घडली आहे. महाविद्यालयाच्या गेटवरच विद्यार्थ्याला अडवून त्याच्याच वर्गातील विद्यार्थ्यांनी मारहाण केली. या प्रकरणी चार विद्यार्थ्यांवर वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात सध्या मराठी - अमराठीचा मुद्दा गाजत आहे. मराठी न बोलण्यावरून ठिकठिकाणी वादाचे, हाणामारीचे प्रकार घडत आहेत. त्यातच मराठी - अमराठीच्या वादाचे लोण महाविद्यालयांपर्यंत देखील पसरले आहे. त्यातून एका मराठी विद्यार्थ्याला जबर मारहाण झाली आहे.

वाशीतील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये हा वाद झाला. विद्यार्थ्यांच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये चॅटिंगदरम्यान मराठी - अमराठीचा वाद उद्भवला होता. त्यातून सूरज पवार (२०) व फैजान नाईक (२०) यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. त्यातून सोमवारी दुपारी महाविद्यालयाच्या गेटवरच दोघांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये फैजान व त्याच्या तीन साथीदारांनी सूरजला लाथा बुक्यांसह हॉकीने मारहाण केली.

याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणात मनसेने देखील उडी घेतली असून वाशी पोलीस ठाण्यात आज भेट देणार आहेत.

कल्याणमध्ये मराठी तरुणीला मारहाण

कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरात एका बाल चिकित्सालयातील मराठी रिसेप्शनिस्ट तरुणीला डॉक्टराना भेटण्यासाठी आलेल्या परप्रांतीय तरुणाने बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली होती. या तरुणीने तिच्या मानेवर लाथ मारत तिच्या केसांना पकडून तिला बेदम मारहाण केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याला कोर्टात हजरदेखील करण्यात आलं होतं. या आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. 

Read More