Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

फडणवीसांकडून थेट सभागृहात जयंत पाटलांना भाजपा प्रवेशाची ऑफर? म्हणाले, 'मोदींच्या सर्व...'

Fadnavis Comment On Jayant Patil: जयंत पाटलांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा असताना आज फडणवीसांनी थेट विधानसभेत त्यांचा उल्लेख केला.

फडणवीसांकडून थेट सभागृहात जयंत पाटलांना भाजपा प्रवेशाची ऑफर? म्हणाले, 'मोदींच्या सर्व...'

Fadnavis Comment On Jayant Patil: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु आहे. मात्र पवारांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आजच पत्रकारांशी चर्चा करताना जयंत पाटलांनी राजीनामा दिला नसल्याचं नमूद केलं आहे. त्यामुळे जयंत पाटलांनी राजीनामा दिलाय की नाही, याबद्दल संभ्रमावस्था आहे. असं असतानाच जयंत पाटील हे भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. ही चर्चा सुरु असतानाच आज थेट विधानसभेच्या कामकाजादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटलांसंदर्भात एक सूचक विधान केलं आहे. ते ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्यात. 

जयंत पाटलांचा प्रश्न अन् त्यावर आलेलं उत्तर

जयंत पाटील यांनी विधानसभेत बोलताना, "बांधकाम कामगार मंडळातर्फे महाराष्ट्रभर पेटी, भांडी वाटपाचा काम सुरु आहे. पंतप्रधान साहेब यांनी सांगीतल की प्रत्येकाच्या खात्यावर डीबीटी करा. असं असताना आपण ही योजना का सुरु ठेवली? मफतलाल हे कपडा बनवतात हे माहीत आहे. मात्र ते भांडी बनवतात हे माहीत नाही," असं म्हटलं. या प्रश्नाला आकाश फुंडकर यांनी उत्तर दिलं, "मफतलाल या निविदेत अपात्र झालेत. 2020 मध्ये जयंत पाटील तुम्हीच या योजनेला मुदतवाढ दिली. आपण राबवलेली योजना आहे जी आम्ही चालवत आहोत," असं फुंडकर म्हणाले. 

अध्यक्षांनी जयंत पाटलांना काढला शाब्दिक चिमटा

यावरही जयंत पाटलांनी आक्षेप नोंदवताना, "प्रशासन मंत्र्याला कधीच सांगत नाही हे अयोग्य आहे. ई-टेंडर प्रमाणे योग्य. तो निर्णय द्यावा असा मंडळाने आदेश दिला. माझ्या आधी ही योजना सुरु होती. मंडळाने निर्णय. घ्यावा असे आम्ही सांगितले," अशी आठवण करुन दिली. यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी, "जयंत पाटील साहेब तुम्ही सध्या तरी प्रश्न विचारू शकतात उत्तर इतक्यात तरी नाही देऊ शकत," असा शाब्दिक चिमटा काढला. यावर जयंत पाटलांनी आपला आक्षेप नोंदवताना, "ठराविक लोकांना काम द्यायचे हे मागील अनेक दिवसापासून सुरु आहे. एजंटचा सुळसुळाट सुरु आहे," असं म्हटलं. 

फडणवीस जयंत पाटलांबद्दल नेमकं काय म्हणाले?

जयंत पाटलांचं हे विधान ऐकताच, मुख्यमंत्र्यांनी जागेवर उभं राहत, "अलीकडे जयंत पाटील यांना मोदींच्या सर्व योजना आवडू लागल्यात. मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार केली जाईल आणि जास्तीत जास्त पारदर्शक कारभार करू," असं म्हटलं. जयंत पाटलांना मोदींच्या योजना आवडत असल्याचं फडणवीसांनी केलेलं विधान ऐकून सभागृहात अनेकांच्या भुवया उंचावल्या. जयंत पाटील यांना लवकरच भाजपामध्ये प्रवेश दिला जाईल या दाव्याला हवा देणारे हे वाक्य असल्याचीही चर्चा आहे. फडणवीसांचं हे विधान जयंत पाटलांना अप्रत्यक्षपणे भाजपामध्ये येण्यासाठी दिलेला सूचक इशारा आहे की काय अशी चर्चाही आहे.

Read More