वैभव बालकुंदे, (प्रतिनिधी) लातूर : छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना मारहाण केल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण मंगळवारी मध्यरात्री पोलिसांनी शरण आलेत. मात्र शरण आल्यानंतर कायदेशीर प्रक्रीया पूर्ण करून चव्हाण यांना तत्काळ जामीन मंजूर करण्यात आला. यावरून आता विजयकुमार घाडगे यांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत आपल्या जीवाला धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली आहे.
लातूरमध्ये छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना मारहाण केल्याप्रकरणात राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पोलीस त्यांचा शोधही घेत होते. मात्र अचानक मंगळवारी मध्यरात्री या मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी सूरज चव्हाण स्वतःहून पोलिसांना शरण आले. सूरज चव्हाण शरण आले ते सीसीटीव्ही फुटेज झी 24 तासच्या हाती लागलं आहे. याआधी घाडगे यांना मारहाणप्रकरणी एकूण अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी दोन जणांना आधीच अटक झाली होती, त्यानंतर आता मुख्य आरोपीसह 8 जण ताब्यात आले असून उर्वरित 1 जणांचा शोध सुरू आहे. मात्र मध्यरात्री सूरज चव्हाण शरण आल्यानंतर अटकेचे सोपस्कार पूर्ण करत चव्हाण यांना रातोरात जामीनही मंजूर करण्यात आलाय आहे.
सूरज चव्हाण मध्यरात्री शरण आल्यानंतर त्यांना तत्काळ जामीन मंजूर करण्यात आला. रातोरात मंजूर झालेल्या या जामीनावरून पीडित विजयकुमार घाडगे यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केलाय. तर पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने आपली तक्रार नोंदवून आरोपी सूरज चव्हाणला सोडून दिलं. त्यामुळे आता आपल्या जिवाला धोका निर्माण झाला असल्याची भीती घाडगेंनी व्यक्त केली.
दरम्यान सूरज चव्हाणांना मिळालेल्या तत्काळ जामिनावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त करत अजित पवारांवर टीकास्त्र डागलंय. सुरज चव्हाण मध्यरात्री शरण आले आणि त्यानंतर त्यांना तत्काळ रातोरात जामिनही मंजूर केलाय. पोलिसांच्या या तत्परतेववर अनेक प्रश्न उपस्थित होताहेत. सर्वसामान्यांना वेगळा न्याय आणि सत्तापक्षातील नेत्यांना वेगळा न्याय आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय.