Pune Viral News: पोलिसांकडून सर्वसामान्यांना आणि सर्वसामान्यांकडून पोलिसांना दिली जाणारी वागणूक कायमच चुकीच्या कारणामुळे चर्चेत असते. अनेकदा पोलीस स्थानकामध्ये तक्रार नोंदवायला गेलेल्यांना फारचा समाधानकारक अनुभव येतोच असं नाही. तर दुसरीकडे दंगल असो किंवा हिंसाचारामध्ये पोलिसांवरही प्राणघातक हल्ले झाल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. मात्र या असल्या वादग्रस्त घडामोडींना फाटा देणारी एक घटना नुकतीच पुण्यात घडली. सध्या ही घटना सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असून त्यासंदर्भातील एक फोटोही व्हायरल होतोय. नेमकं घडलंय काय आणि हे सारं घडलं कुठे याबद्दल जाणून घेऊयात...
सोशल मीडियावर पोलिसांबद्दल आलेले बरे-वाईट अनुभव शेअर करणारे अनेकजण दिसून येतात. असाच काहीसा प्रसंग पुण्यातील भोसरी येथे घडला. सामान्यपणे महिला पोलिसांना रात्रीच्या गस्तीवर ठेवल जात नाही. मात्र याला काही अपवाद असतात अथवा कामाच्या शिफ्टच अशा असतात की घरी पोहचेपर्यंत अनेकदा महिला कर्मचाऱ्यांनाही उशीर होतो. अशाच दोन महिला पोलीस कर्मचारी अचानक रात्री तुमच्या दारात जवळ हॉटेल कोणतं सुरु असेल विचाराला आल्या तर तुम्ही काय कराल? एखाद्या हॉटेलचा पत्ता सांगाल किंवा जवळ कुठे खाणं मिळू शकतं ते सांगाल. मात्र पुण्यातील शशिकला उभे यांनी अशी विचारणा करणाऱ्या दोन महिला पोलिस शिपायांना एक छान सप्राइज दिलं. शशिकला यांनी दिलेलं सप्राइजपासून नेटकरी भारावून गेले आहेत.
व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये एका मध्यवर्गीय घरात गाऊन परिधान करुन बसलेली महिला जेवण वाढताना दिसत असून पोलिसाच्या गणवेशातील दोन तरुणी मांडी घालून जमिनीवर बसून जेवताना दिसत आहेत. या फोटोसहीत फिरणाऱ्या कॅप्शनमध्ये, "रात्रीचे 11 वाजले अचानक दोन महिला पोलिस शशिकलाताई उभे (भोसरी) यांच्या दारापुढून जात असताना उभे यांच्या विचारपूस करू लागल्या. जवळपास एखादे होटेल किंवा खाणावळ आहे का? असा प्रश्न या महिला पोलिसांनी विचारला. त्यांच्या चेहर्यावरून असे वाटत होते की त्या खूप थकलेल्या आणि भुकेल्या असाव्यात. क्षणभराचाही विचार न करता उभेताईंनी त्यांना घरात यायला सांगितले. तात्काळ स्वयंपाकाला लागल्या, त्यांना भरपुर जेवू घातले. मेघा आणि प्राजक्ता (दोघीही राहता नागपूर) अशी त्या महिला पोलिसांची नावे आहेत. त्या नंतर उभे ताईंनी रात्री 12.30 वाजता या दोघींना सावित्रीबाई फुले हॉल येथे सोडून आल्या. या माणुसकीला आमचा सलाम," असं म्हटलं आहे.
अनेकांनी हा फोटोवर कमेंट करुन शशिकला यांचं कौतुक केलं आहे. "अनेक महिला पोलिसांची वेळी अवेळी ड्युटी असते आणि त्यांना फार समस्यांना तोंड द्यावे लागते, अशा वेळी आपण केलेली मदत निश्चितच मोलाची आहे," असं एकाने म्हटलं आहे. तर अन्य एकाने, "भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती जर इतक्या प्रेमळ मनाचा झाला तर देश स्वर्गासमान होईल," असं म्हटलं आहे. काहींनी ही पोस्ट अनेक वर्षांपूर्वीची असून ती आता नव्याने व्हायरल झाल्याचं म्हटलं आहे. यावर सकारात्मक गोष्टी व्हायरल केल्यास काय हरकत आहे असा युक्तीवाद केल्याचं पाहायला मिळत आहे.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)