Viral Video: प्रत्येकाला आपल्या डोक्यावर कायम आई-वडिलांचं छत्र राहावं असं वाटत असतं. वडील किंवा आई नसल्याने आयुष्यात किती पोकळी निर्माण होते, हे ज्यांच्या आयुष्यात हे सुख नाही त्यांनाच कळतं. त्यातही जर कळत्या वयात हे छत्र हरपलं तर आता पुढील आयुष्य कसं काढायचं हा मोठा प्रश्न मुलांसमोर असतो. अनेकदा तर वडील असूनही ते व्यसनाच्या आहारी गेल्याने मुलांना त्यांचं प्रेम, आधार मिळत नाही. आणि जेव्हा तो आधार मिळत नाही तेव्हा नेमक्या काय भावना असतात हे दर्शवणारा एका मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडीओत चिमुरडी शाळेच्या गणवेशात हातात माईक घेऊन उभी असल्याचं दिसत आहे. यावेळी ती आपल्या वडिलांबद्दल सांगताना धायमोकळून रडत आहे. ती सांगते की, “माझे पप्पा दारूचं व्यसन करतात. त्यांना दोन वेळा रक्ताच्या उलट्या झाल्या. मम्मीने त्यांना जेवढे पैसे होते, त्या पैशात दवाखान्यात नेले होते. पण दुसऱ्यावेळी आईकडे पैसे नव्हते. आईने शेत विकलं आणि सर्व पैसे पप्पांसाठी दवाखान्यात घालवले. दुसऱ्या वेळेस पप्पाचा अपघात झाला होता. मी शाळेत होती मला घरी आल्यावर कळले की माझ्या पप्पांचा अपघात झाला आणि त्यांना लाइफलाइनमध्ये नेले होते. मला माझ्या पप्पाला भेटायला जायचं होतं मी फार रडत होते.”
” मला माझे पप्पा पाहिजे होते. माझ्या पप्पाचा एक हात आणि एक पाय काम करत नाही. माझ्या आईमुळे मी शाळेत शिकते. माझी आई दुसऱ्याच्या घरात कामाला जाते आणि मला शिकवते. माझ्या आईचं नाव मी कधीच खराब करणार नाही. मी स्वत:ला चांगले वळण लावेल. मी खूप मोठी होऊन आईवडिलांना कायम सांभाळेन,” असं सांगताना तिच्या डोळ्यातील अश्रू थांबताना दिसत नाही.
यादरम्यान तिच्या शेजारी प्रेरणादायी वक्ते वसंत हंकारे बसले होते. ते तिला मिठी मारतात आणि धीर देण्याचा प्रयत्न करतात. यानंतर ते तिथे उभ्या संजीवला आवाज देतात आणि दहावीपर्यंतंच पूर्ण शिक्षण आपण करणार आहोत असं सांगतात. हा व्हिडीओ पाहून अनेकजण भावूक झाले आहेत.