Wardha Grandmother Pass 10th: वर्ध्यात हिंगणघाट तालुक्यातील जामनी येथील 68 वर्षाच्या आजीबाईंनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलीय. 17 नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देणाऱ्या या आजीचे सर्वत्र कौतुक होतंय. अजीसोबत नातूदेखील दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालाय. उत्तीर्ण झालेल्या इंदूताई यांना 51 टक्के गुण मिळाले आहेत तर नातू धीरज याला 75 टक्के गुण मिळाले आहेत.
एकाच वेळी आजी आणि नातू परीक्षेला बसले होते आणि समोर आलेल्या निकालानुसार ते पासही झालेयत. केवळ सातवी पर्यत शिक्षण पूर्ण झालेल्या इंदूताई परमेश्वर बोरकर यांना पुढे शिकता आले नाही. पण वयाच्या 68व्या वर्षी इंदूताईना प्रथम संस्थेच्या मदतीने त्यांना पुन्हा शिकण्याची संधी मिळाली. आणि त्यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण होत संधीच सोनंदेखील केलं.
जामनी गावात इंदूताई बचत गटाच्या कामात सतत पुढाकार घेताना दिसतात. इंदूताईनी माहेरी असताना सातवीपर्यत शिक्षण पूर्ण केलं होतं. पण त्यानंतर त्यांचं लग्न झालं. शिकण्याची इच्छा असतानाही पुढे शिकता आले नाही. पण प्रथम या संस्थेने शिकण्याची इच्छा असणाऱ्या महिलांना दुसरी संधी देत दहावीची परीक्षा तयारी करून घेतली. त्यांना परीक्षेला बसविलं.
त्यात इंदूताई यांनीदेखील वर्षभर दहावीचे धडे गिरवत परीक्षा दिली. इंदूताईसोबत परीक्षा द्यायला केंद्रावर नातू देखील होता. आजी आणि नातवाची दहावीची परीक्षा एकाच वेळी झाल्याने हे दोघेही चर्चेचा विषय ठरले. म्हातारीला या वयात परीक्षा द्यायची सुचली? असे म्हणत टीकाही व्हायला लागली. पण आता याच म्हातारीने परीक्षेत यश मिळवून बोलणाऱ्यांची तोंड बंद केलय.