Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

सफाई कर्मचाऱ्याला विनामोबदला शिक्षकाची जबाबदारी,शिक्षण राज्यमंत्र्याच्या जिल्ह्यातचं शिक्षणाचा खेळखंडोबा!

Wardha School: सफाई कर्मचारी चेतनने बारावीनंतर बीए चे दुसरे वर्ष पूर्ण केले. शहीद भगत सिंग प्राथमिक शाळेतुन बदलून गेलेल्या शिक्षकाच्या जागेवर स्वच्छता कर्मचाऱ्याची नियुक्ती झाली

सफाई कर्मचाऱ्याला विनामोबदला शिक्षकाची जबाबदारी,शिक्षण राज्यमंत्र्याच्या जिल्ह्यातचं शिक्षणाचा खेळखंडोबा!

मिलिंद आंडे,झी 24 तास,वर्धा: वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव नगर परिषदेत स्वच्छता विभागात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला प्राथमिक शाळेत शिकविण्याची जबाबदारी देण्यात आली. नगर परिषद सीईओची स्वाक्षरी असलेलं आदेशाचं पत्र सफाई कर्मचाऱ्याच्या घरी पोहचलं.पत्र वाचून सफाई कर्मचारी देखील आवाकं झालाय. 

आधीच नगर परिषद शाळांची अवस्था बिकट असताना पुलगावच्या नगर परिषदेतील शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय. आता मात्र नगर परिषद प्रशासनाने सारवा सारव करीत क्लरीकल चूक झाल्याचे सांगत हा आदेश रद्द करण्याची खटाटोप केला. या प्रकरणात एक धक्कादायक वास्तव समोर आलंय.

नगर परिषदेच्या स्वच्छता विभागात चेतन चांडाले हा सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. पण या सफाई कर्मचाऱ्याला पुलगाव येथील नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या  शहीद भगतसिंग प्राथमिक शाळेत  शिकविण्याचा आदेश नगर परिषदेच्या शिक्षण विभागाने काढलाय. या पत्रावर मुख्याधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेतली गेली. 

याबाबत कोणत्याही प्रकारचा आर्थिक मोबदला दिला जाणार नसल्याचे देखील पत्रात नमूद करण्यात आले. पण मुळच्या स्वच्छता विभागात कार्यरत असणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्याला अशी शिक्षण सेवकाची जबाबदारी दिल्याने खडबळ उडाली. ही जबादारी तात्पुरती जरी असली तरी याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. 

सफाई कर्मचारी चेतनने बारावीनंतर बीए चे दुसरे वर्ष पूर्ण केले. शहीद भगत सिंग प्राथमिक शाळेतुन बदलून गेलेल्या शिक्षकाच्या जागेवर स्वच्छता कर्मचाऱ्याची नियुक्ती झालीय.  पण नगर परिषद प्रशासनाने आता सारवासारव करीत मुख्याधिकाऱ्यांनी काढलेला आदेश रद्द केलाय. या प्रकरणाने मात्र नगर परिषदच्या शिक्षण विभागात सावळा गोंधळ असल्याची बाब मात्र समोर आलीय.

पुलगावच्या शिक्षण विभागात सफाई कर्मचाऱ्यांचा आदेश निघाला तेव्हा शाळेचे मुख्यधापक देवळी येथे ट्रेनिंग वर गेले होते. त्यांना या मुख्यधिकाऱ्याच्या आदेशाबद्दल माहीत नाही. माझ्या पश्चात हा आदेश आल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली असून शिक्षण विभागाच्या खेळ खंडोब्याच्या आदेशामुळे शिक्षण विभाग हादरून गेले. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री,वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्या जिल्ह्यात हे धक्कादायक वास्तव पुढे आले आहेय.या विभागाच्या अधिकाऱ्यांवर कोणती चौकशी होते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read More