Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

गजर असेल तरच बाहेर पडा! मुंबई, कोकणात राहणाऱ्यांना इशारा; रविवार, सोमवार अन् मंगळवारी...

Weather Updates: मागील काही दिवसांपासूनचा ट्रेण्ड पहिल्यास पुढील आठवडा मुंबई आणि कोकणवासियांची चिंता वाढवणारा असेल यात शंका नाही.

गजर असेल तरच बाहेर पडा! मुंबई, कोकणात राहणाऱ्यांना इशारा; रविवार, सोमवार अन् मंगळवारी...

Weather Updates: मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये रविवारी, सोमवार आणि मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. माजी हवामान अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी या तिन्ही जिल्ह्यांमध्ये 9, 10 आणि 11 मार्च रोजी उष्णतेची लाट येईल, असं  सांगितलं आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटा, तर दक्षिण कोकणातील काही भागांत उष्णतेच्या लाटा येतील, असेही त्यांनी इशारा देताना नमूद केलं आहे.

40 अंश तापमान नोंदविले जाणार

मुंबईचे कमाल तापमान शुक्रवारी (7 मार्च रोजी) 35.8 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. येत्या बुधवारपर्यंत म्हणजेच उष्णतेची लाट येऊन गेल्यानंतर यात आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 12 मार्चपर्यंत मुंबई महानगर प्रदेशात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. पालघर, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याणमध्ये 40 अंश तापमान नोंदविले जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. रविवार ते मंगळवारदरम्यान उन्हाचा तडाखा तीव्र असू शकतो, असा अंदाज आहे.  

उष्णतेची लाट म्हणजे काय?

कोकणात उष्णतेची लाट म्हणजे दिवसाचे कमाल तापमान 37 अंशांपेक्षा अधिक नोंदविले जाईल.ते त्या दिवसाच्या सरासरी तापमानापेक्षा 4 अंशांनी जास्त असेल. कोकण विभागात चालू आठवड्याच्या सुरुवातीपासूनच उष्णतेचे चटके जाणवत असून पुढील आठवड्याच्या सुरुवातीपर्यंत हे वातावरण कायम असण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळेच गरज असेल तरच दिवसा बाहेर पडा असं आवाहन करण्यात आलं आहे.

उष्णता का वाढली आहे?

पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमान आणि आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. याचा परिणाम कोकणातील वातावरणावर झाला असून रविवार, सोमवार आणि मंगळवारी दक्षिण आणि उत्तर कोकण विभागातही तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट जाणवू शकते. कोकण विभागात फेब्रुवारीमध्ये उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेले असताना हीच परिस्थिती आता मार्चच्या सुरुवातीपासून अनुभवायला लागत आहे.

उर्वरित महाराष्ट्रात वातावरण कोरडे

दक्षिण कोकणात रायगड आणि रत्नागिरीमध्ये शुक्रवार आणि शनिवारी दमट आणि उष्ण वातावरणामुळे वाढलेली अस्वस्थता तर रविवारी आणि सोमवारी उष्णतेची लाट तुरळक ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे.सिंधुदुर्गातही रविवारी आणि सोमवारी उष्ण आणि दमट वातावरणामुळे त्रास होऊ शकतो. उर्वरित महाराष्ट्रात वातावरण कोरडे असू शकते. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे किमान तापमानाचा पारा खाली उतरला आहे. राज्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ येथे किमान तापमानाचा पारा 10 ते 12 अंशांपर्यंतही खाली उतरल्याची गुरुवारी नोंद झाली.

 

Read More