World Women Day 2025 Raj Thackeray Facebook Post: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका खास पोस्टमधून महिलांना 'जागतिक महिला दिना'च्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी फेसबुकवर एक खास पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या सर्व माता-भगिनींना मनापासून शुभेच्छा," असं म्हणत राज यांनी आपल्या पोस्टला सुरुवात केली आहे.
"मी अनेकदा माझ्या भाषणांमध्ये म्हणत आलो आहे की, जर आसपास मोठं परिवर्तन अपेक्षित असेल तर स्त्रियांचा राजकारणातील सहभाग हा वाढायलाच हवा आणि त्यासाठी फक्त आरक्षण देऊन पुरेसं नाही तर महिलांनी राजकारणात येऊन त्यांना त्यांचे निर्णय स्वतंत्रपणे घेण्यासाठीची व्यवस्था निर्माण करायला हवी," असं राज यांनी पोस्टच्या सुरुवातीला म्हटलंय.
पुढे राज ठाकरेंनी त्यांच्या समर्थकांना पूर्णिमा देवी बर्मन यांची कथा सांगितली आहे. "आज भारतच काय जगासमोर जी अनेक आव्हानं आहेत, त्या आव्हानांपैकी सगळ्यात गंभीर कुठलं आव्हान असेल तर ते पर्यावरणाच्या ऱ्हासाचं आणि यावर अगदी मुळापासून काम कोण करू शकत असेल तर त्या महिलाच हे माझं ठाम मत आहे. याबाबतच एक फारच चांगलं उदाहरण आहे ते 'पूर्णिमा देवी बर्मन' यांचं. 'टाईम' या प्रख्यात आंतरराष्ट्रीय मासिकाच्या 2025 सालच्या 'विमेन ऑफ द इयर' च्या यादीत ज्यांचा समावेश आहे, त्या 'पूर्णिमा देवी बर्मन'. आसामच्या कामरूप भागात जन्मलेल्या पूर्णिमा देवी यांचं शिक्षण प्राणिशास्त्रातलं आणि, पुढे त्यांनी जैवविविधता या विषयांत पीएचडी संपादन केली. हे सुरु असताना 2007 ला त्यांना एक शेतकरी झाडाची फांदी कापताना दिसला. कारण काय? तर त्यावर करकोच्याच घरटं होतं. हा पक्षी आसाममध्ये फारसा शुभ मानला जात नव्हता, मग अशा पक्षाचं घर माझ्या आवारात का? म्हणून त्याचं घरटंच नष्ट करण्याचा प्रयत्न सुरु होता. एक पक्षी जर अशाप्रकारे उध्वस्त झाला तर फक्त तो पक्षी नाही संपूर्ण पर्यावरणाची व्यवस्थाच बिघडेल, हे त्यांच्यातल्या जैवविविध अभ्यासकाला माहित होतं. म्हणून त्यांनी 'ह्रगिला आर्मी' थोडक्यात 10,000 स्त्रियांचा एक ग्रुपच तयार केला आणि संपूर्ण आसाममध्ये त्यांनी करकोचा पक्षी वाचवण्यासाठी एक चळवळ सुरु केली. याचा दृश्य परिणाम म्हणजे पुढे 16 वर्षांत करकोचे जे नामशेष पक्ष्यांच्या यादीत गेले होते ते पुन्हा पुनर्स्थापित झाले आणि या 10,000 महिलांसाठी पूर्णिमा देवींनी बचत गट देखील तयार केले," असं राज ठाकरे म्हणाले.
"अशी उदाहरणं ही देशात आणि महराष्ट्रात देखील आहेत. अशा कामांबाबतची महिलांची अंतःप्रेरणा ही शक्तिशाली असते आणि त्यातून निर्माण होणारं काम मोठं असतं हा अनुभव आहे. या अंतःप्रेरणेला, शक्तीला अधिक ताकद मिळू दे हीच इच्छा. माझ्या पक्षात मी अनेक महिला मेळाव्यात सांगितलं आहे की ज्यांना फक्त राजकारणच नाही तर समाजकारणात सुद्धा काही चांगलं काम करायचं असेल त्यांनी जरूर यावं, इथे तुमच्या सर्जनशीलतेला पूर्ण वाव असेल," असा शब्द राज यांनी पुन्हा एकदा दिलं आहे.