अखेरचा मुघल सम्राट बहादूर शाह जफरचा वंशज असल्याचा दावा करणारे याकूब हबीबुद्दीन तुसी यांनी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांना पत्र लिहून छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबरीचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरुन नागपूरमध्ये झालेल्या रॅलीदरम्यान हिंसाचार उसळल्यानंतर जवळजवळ एक महिना उलटल्यानंतर ही मागणी करण्यात आली आहे.
मुघल सम्राटाच्या कबरीच्या वक्फ मालमत्तेचा मुतवल्ली (काळजीवाहक) असल्याचा दावा करणारे प्रिन्स याकूब यांचं म्हणणं आहे की, ही कबर 'राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक' म्हणून घोषित करण्यात आलं आहे आणि प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायदा, 1958 अंतर्गत संरक्षित आहे.
"या कायद्यातील तरतुदींनुसार संरक्षित स्मारकाजवळ किंवा जवळ कोणतेही अनधिकृत बांधकाम, फेरफार, तोडफोड किंवा उत्खनन करता येणार नाही. अशी कोणतीही कृती कायद्यानुसार बेकायदेशीर आणि दंडनीय मानली जाईल," असं संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना लिहिलेल्या पत्रात सांगण्यात आलं आहे. त्यांनी कबरीच्या सध्याच्या स्थितीचा निषेध केला असून संरक्षणासाठी सुरक्षा कर्मचारी तैनात केले पाहिजेत अशी मागणी केली आहे.
"चित्रपट, माध्यमं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून इतिहासाबाबत दिशाभूल केल्याने सार्वजनिक भावना हाताळण्यास मदत झाली आहे, परिणामी अनावश्यक निषेध, द्वेष मोहिमा आणि पुतळे जाळण्यासारख्या प्रतीकात्मक आक्रमक कृत्ये होत आहेत," असंही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय कायदा वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांच्या फायद्यासाठी सांस्कृतिक वारशाचे रक्षण आणि संवर्धन करण्याचं बंधन घालत असल्याची आठवण त्यांनी करुन दिली आहे.
या पत्रात भारताने 1972 च्या जागतिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या संरक्षणासंबंधी युनेस्को कन्व्हेन्शनवर स्वाक्षरी केल्याचा उल्लेख केला आहे आणि पुढे म्हटले आहे की, "अशा स्मारकांचा नाश, दुर्लक्ष किंवा बेकायदेशीर बदल करणे हे आंतरराष्ट्रीय दायित्वांचे उल्लंघन ठरेल"
त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासचिव कार्यालयाला या प्रकरणाची दखल घेण्याचे आणि केंद्र सरकार आणि एएसआयला औरंगजेबाच्या कबरीला "राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार पूर्ण कायदेशीर संरक्षण देण्याचे निर्देश देण्याचं आवाहन केलं आहे.