वैभव बालकुंदे झी 24 तास लातूर : शेतीच्या मशागतीसाठी बैलांचा खर्च परवडत नाही म्हणून एका पंचाहत्तर वर्षाच्या आजोबांनी कोळपणीसाठी जू खांद्यावर घेतल्याची घटना झी 24 तासनं उघडकीस आणली आहे. अंबादास पवार या शेतक-याच्या दुर्दैवाचे दशावतार झी 24 तासनं दाखवल्यानंतर उशिरा जाग आलेल्या सरकारनं शेतक-याला मदतीचा हात दिला आहे.
शेतात कोळपणी करणारे हे अंबादास पवार अजोबा... वयाच्या पंचाहत्तरीत आजोबांना जू स्वतःच्या खांद्यावर घेऊन कोळपणी करावी लागते. कोळपणी करण्यासाठी मराठवाड्याच्या लातूर पट्ट्यात यंत्र किंवा बैल वापरतात. पण अंबादास पवार आणि मुक्ताबाई पवार यांच्याकडं ना बैल होता. ना कोळपणी यंत्र भाड्यानं घेण्यासाठी पैसे. अंबादास पवारांनी खांद्यावर जू घेतला.डोक्यावर कर्जाचा डोंगर. मुलगा रोजगाराच्या शोधात शहरात गेलेला. त्याला त्याचं पोट भरण्याची भ्रांत पडली आहे. अशा परिस्थितीत परिस्थितीला शरण न जाता पंचाहत्तरीत अंबादास पवारांनी जू खांद्यावर घेतला.
हा व्हिडिओ खरं तर दोन तीन दिवसांपूर्वीचा आहे. झी 24 तासला हा व्हिडिओ मिळाल्यानंतर आम्ही अंबादास पवारांचा शोध घेतला. अंबादास पवार लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील हाडोळती गावातले रहिवासी असल्याची माहिती मिळाली. अंबादास पवारांची कहाणी पहिल्यांदा झी 24 तासवर सकाळी 8 वाजता चालवली... विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी आलेल्या लोकप्रतिनिधींना झी 24 तासनं ही बातमी दाखवली आहे. झी 24 तासची बातमी पाहिल्यावर विरोधकांनी सरकारवर टीकेचे आसूड ओढले. तर सत्ताधा-यांनी शेतक-याला न्याय देण्याची भूमिका घेतली.
अंबादास पवारांची ही व्यथा पाहिल्यानंतर कृषिमंत्र्यांना उशिरा का होईना जाग आली. अंबादास पवारांना तातडीची मदत करण्याची घोषणा कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी केली आहे. सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांनीही अंबादास पवारांना थेट फोन लावला. अंबादास पवारांनी मंत्र्यांनी फोन केला म्हणून आभाळ मागितलं नाही. फक्त मानेभोवती पडलेला कर्जाचा फास तेवढा काढा अशी विनंती त्यांनी केली.
झी 24 तासनं अंबादास पवारांची व्यथा पहिल्यांदा जगासमोर मांडली. झी 24 तासच्या बातमीनंतर माध्यमांच्या विश्वालाही जाग आली. मग सुरु झाली श्रेयवादाची चढाओढ. दुस-याचं मूल कडेवर घेऊन आपलाचा मुलगा म्हणून मिरवणारे मिरवू लागले. झी २४ तासला या श्रेयवादात रस नाही. आम्ही सरकारला फक्त आरसा दाखवला... शेतक-यांची व्यथा दाखवण्यासाठी अंबादास पवारांचा तो व्हिडिओ दाखवला. त्यानंतर जे झालं ते जगासमोर आहे.
कोणत्या गोष्टीचं श्रेय घ्यायचं याचं काहींना भान उरलेलं नाही. अंबादास पवार यांना जसा न्याय मिळाला. तसा न्याय महाराष्ट्रातल्या शेकडो शेतक-यांना मिळावा हीच अपेक्षा. बाकी श्रेय लाटणा-यांना त्यांचं त्यांना लखलाभ. झी 24 तास जागल्याचं काम करत राहणार आहे. सरकारला आरसा दाखवत राहणार.