Beed Viral video: बीडमधील गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. दररोज नवनवे गुन्हे समोर येऊ लागले आहेत. अशातच आता बीडमधील आणखी एका मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांना धाक उरलाय की नाही असा प्रश्न उपस्थित झालाय.
बीडमधील मारहाणीची मालिका सुरूच आहे. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीडमधील अनेक घटना समोर येऊ लागलेत. बीडमध्ये पुन्हा एकदा क्रूर मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. आंबेजोगाईमधील दस्तगीरवाडीत दारू प्यायला पैसे दिले नाहीत म्हणून एका तरुणाला अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे. आरोपींनी तरुणाचे पैसे आणि मोबाईलही हिसकावला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. तर दोन आरोपी फरार झाले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत पुन्हा एकदा बीडमधील धक्कादायक वास्तव समोर आणलं आहे.
बीडमधील आणखी एका टोळीवर मकोका
एका बाजूला बीडमध्ये गुन्हेगारी बळावत असतानाच बीड पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात मोहीम अधिक तीव्र केली आहे. बीडमधील या वाढत्या गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी कडक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. वाल्मिक कराडच्या टोळीवर मकोका लावल्यानंतर आणखी एका टोळीवर मकोका लावण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे या टोळीमध्ये 3 महिलांचा समावेश आहे.
भोसले गँगवर मकोका
- भोसले गँगवर मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल
- बीड, अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यात अनेक गुन्हे
- टोळीमध्ये एकूण 6 गुन्हेगार, 3 महिलांचा समावेश
- टोळीकडून आष्टीमधील कडा इथं 2 सख्ख्या भावांचा खून
- खूनप्रकरणात टोळीतील सर्वजण अटकेत
- टोळीवर खून, दरोडा, चोरी, अवैध शस्त्रांसारखे 13 गंभीर गुन्हे
अशा कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यास मदत होणार असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. एका बाजूला बीडमध्ये गुन्हेगारीचा विळखा घट्ट होत चालला आहे. तर दुसऱ्या बाजूला पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. त्यामुळे बीडमधील ही वाढती गुन्हेगारी रोखण्यात पोलीस प्रशासनाला यश मिळतंय का हे पाहावं लागणार आहे.