Mumbai Crime News: डिजीटल पेमेंटचा वापर अलीकडच्या काळात वाढत चालला आहे. हल्ली मोठ्या मॉलपासून ते छोट्या पान टपरीवरही क्यू-आर पेमेंट म्हणजेच गुगल पे किंवा डिजीटल पेमेंट केले जाते. मात्र हेच व्यवहार कधीकधी तोट्यातदेखील जाऊ शकतात. तंत्रज्ञानाचा अतिवापर कधी कधी अंगलट येऊ शकतो. मुंबईतील खार, वांद्रे परिसरात दुकानदार, टपऱ्यांवर स्वतःचे क्यूआर कोड लावलेल्या व्यापाऱ्यांना व दुकानदारांची फसवणूक झाली आहे. दहावी शिकलेल्या उत्तर प्रदेशच्या तरुणाने ही व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे.
खार रेल्वे स्थानक परिसरात व्यवसाय करणाऱ्या एका दुकानदाराच्या दुकानाबाहेर चिकटवलेला क्यूआर कोड स्कॅन करून एका ग्राहकाने पैसे अदा केले होते. मात्र, ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याने गुप्ता यांनी ग्राहकाला पैसे अदा केल्यानंतर व्यवहार पूर्ण झाल्यानंतर येणारा मेसेज दाखवण्यास सांगितला. व्यवहार पूर्ण झाला होता, मात्र पैसे शिवम दुबे नावाच्या व्यक्तीच्या खात्यावर जमा झाल्याचे दिसत होते. या प्रकारानंतर गुप्ता यांनी तातडीने खार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे खार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजीव धुमाळ, निरीक्षक वैभव काटकर यांच्या मार्गदर्शनात दुबेला गोरेगावतून अटक केली. या घटनेनंतर पोलिसांनी एका संघटीत टोळीच्या सहभागाचा संशय व्यक्त केला आहे. तसेच दुकानदारांना सजग राहण्याचे आवाहन केले आहे.
खार पोलिस पथकाने गुप्ता यांच्या दुकानाबाहेरील क्यूआर कोडचे तांत्रिक विश्लेषण केले. त्या कोडवरून शिवम दुबेच्या ज्या बँक खात्यात पैसे जमा होत होते. त्या खात्याचे सर्व तपशील संबंधित मिळवले. या खात्याशी संलग्न मोबाईल क्रमांकाआधारे पथकाने दुबेचा नेमका ठावठिकाणा शोधताना त्याला पोलिसांनी अटक केली.
काहीच महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातून मुंबईत आलेल्या दुबेला ही कल्पना कशी सुचली, या गुन्ह्यात त्याला कोणी सहकार्य केले किंवा कोणाच्या आदेशावरून त्याने हे कृत्य केले, याचा तपास पोलिस करत आहेत. या गुन्ह्यात निश्चित आणखी काही आरोपी सहभागी असावेत, असा संशय वरिष्ठ पोलिस निरीक्षक धुमाळ यांनी व्यक्त केला आहे. धक्कादायक म्हणजे शिवम दुबे यांनी त्याच्या खात्याशी संलग्न क्युआर कोडच्या कलर झेरॉक्स खार, वांद्रे येथील दुकानाच्या टपऱ्यांवर, भितींवर, दरवाज्यावर चिटकवल्या. दुकाने बंद झाल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमरासा त्याने हा कारनामा केला.
पोलिसांनी चौकशी केल्यानंतर दुबेने सहा महिन्यात विविध व्यावसायिकांचे ५० हजार रुपये तीन खात्यांवर जमा झाल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. प्रत्यक्षात ही रक्कम लाखोंच्या घरात असावी, असा संशय आहे.
ग्राहकांना सुलभ व्हावे म्हणून एकाच क्यू आर कोडच्या अनेक प्रती दुकानदार काढून घेतात. दुकानांच्या बाहेरील भिंतींवरही त्या चिकटवलेल्या आढळतात. रात्री दुकाने बंद केल्यावर क्यूआर कोड तसेच बेवारस राहतात. दुबे प्रमाणे अन्य कोणीही स्वतःचा कोड सहज चिकटवू शकतो. त्यामुळे क्यूआर कोड कायम सुरक्षित ठेवावेत, त्याद्वारे पेमेंट स्वीकारण्याची खातरजमा करणारे यंत्र वापरावे, ग्राहकाने पैसे अदा केल्यावर खात्यावर जमा झाल्याची खातरजमा करावी, असे आवाहन सायबर तज्ज्ञांनी केले आहे.