Mumbai Crime News: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. 54 वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या 35 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. एलटी मार्ग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. काळबादेवी येथील हनुमान लेन परिसरात मयत व्यक्ती राहत होता. राहत्या घरातच त्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाल होती.
मिळालेल्या माहितीनुसार, 16 फेब्रुवारी रोजी 54 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. मृतदेह संपूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी प्राथमिक तपास केल्यानंतर, मयत व्यक्तीहा त्या इमारतीचा मालक होता. त्यातील बरेचशी घरे त्यांनी भाड्याने दिली होती. ते एकटेच राहत असून घरं भाड्याने दिल्यावर येणाऱ्या पैशांतून ते घर चालवत होते. शेजाऱ्याशी चर्चा केल्यानंतर मयत व्यक्तीचे लग्न झाले नसून ते एकटेच राहत असल्याचे समोर आले होते.
पोलिसांनी घराची झाडाझडती घेतल्यानंतर लक्षात आलं की मयत व्यक्तीचे दोन मोबाईल घरातून गायब होते. पोलिसांनी शेजाऱ्यांकडून मोबाइल नंबर घेऊन पुढील शोध सुरू केला. गेल्या आठवड्यात पोलिसांनी हरवलेल्या मोबाईलपैकी एक फोन आणि एका खरेदीदाराचा शोध घेतला. त्यानंतर फोन विकणाऱ्या व्यक्तीची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी सोमवारी संशयिताचा माग काढला. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत व्यक्ती समलैंगिक होती आणि आरोपीसोबत त्याचे लैंगिक संबंध होते. 14 फेब्रुवारी रोजी आरोपीसोबत जवळीक साधत असताना पीडीत व्यक्तीला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि ते बेशुद्ध पडली, पीडित व्यक्तीला बेशुद्ध झालेले पाहून घाबरून आरोपी कोणतीही वैद्यकीय मदत न देता घटनास्थळावरून पळून गेला.
आरोपीने मृताला तातडीने वैद्यकीय मदतीची आवश्यकता असताना बेशुद्ध अवस्थेत मरणासन्न अवस्थेत सोडले. त्याच्या निष्काळजीपणामुळे पीडितेचा मृत्यू झाला. त्याने गुन्हा कबूल केला आहे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे, असं एका अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
"आरोपी त्या परिसरात ऑफिस बॉय म्हणून काम करत होता असून बोरिवली पूर्वेला राहत होता. तो घटनेच्या काही महिन्यांपूर्वी मृताच्या संपर्कात आला होता. काल संध्याकाळी शोध पथकाच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात आली आणि त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील तपास सुरू आहे," असेही अधिकाऱ्याने पुढे सांगितले.