Navi Mumbai Crime News : मुंबईतील दादर परिसरात एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. ज्यामध्ये आरोपींनी पीडित मुलीला एका रुमवर घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला होता. त्यानंतर या पीडित मुलीला त्यांनी दादरच्या रेल्वे स्थानक परिसरात सोडले. या घटनेनंतर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया आल्या. अशातच ही घटना ताजी असताना महिला दिनीच नवीन मुंबईमधील तळोजा येथील एका नराधमाने 8 वर्षांच्या लहान मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना समोर आली.
महिला दिनीच तळोजा विभागात 8 वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. तळोजा फेज 2 मधील केदार गृहसंकुलमधील हा धक्कादायक प्रकार समोर आला असून केदार गृहसंकुलात राहणाऱ्या एका नराधम तरुणाने 8 वर्षीय चिमुकलीला गोड बोलून आपल्या रूममध्ये घेऊन गेला. रुममध्ये नराधमाने तिच्यासमोर अश्लील चाळे करत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हे पाहताच पीडित मुलीने लगेच आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. नराधमाच्या तावडीतून तिने पळ काढला. मुलीचा आरडाओरडा ऐकून तेथील स्थानिक नागरिकांनी लगेच घटनास्थळाकडे धाव घेतली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
ही घटना उघडकीस येताच सोसायटीमधील संतप्त नागरिकांनी नराधम तरुणाला चोप देत पोलिसांना बोलावून नराधमाला पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. सदर घटनेमुळे सोसायटीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह आरोपीवर अनेक विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या या घटने प्रकरणी तळोजा पोलीस अधिक तपास करत आहेत.