Ahmedabad Air India Crash Simulator Test: अहमदाबादमध्ये जून महिन्यात अपघात झालेल्या एअर इंडियाच्या बोईंग 787-8 विमानामध्ये नेमके काय झाले आणि कशामुळे अपघात झाला असावा याचा शोध घेण्यासाठी संपूर्ण घटनाक्रम आणि विमानात काय झालं हा सारा घटनाक्रम रिक्रिएट करण्यात आला. यावेळी एअर इंडियाच्या वैमानिकांनी सिम्युलेटरवर अत्यंत कठीण परिस्थिती निर्माण करत केलेल्या चाचणीमध्ये विमानात बिघाड होऊनही ते उडतच राहिल्याचा निष्कर्ष समोर आला आहे.
या चाचणीमधून अपघातग्रस्त विमानात नेमका काय बिघाड झाला होता, याचा उलगडा झालेला नाही. मात्र विमानाचा अपघात होण्यासाठी कोणत्या शक्यता निर्माण होऊ शकतात, याचा विचार या सिम्युलेटर चाचण्यांमध्ये करण्यात आला. ही सिम्युलेटर चाचणी वैमानिकांनी स्वतःहून मुंबईतील सिम्युलेटरमध्ये केली असून, यामध्ये कंपनीचा कोणताही संबंध नसल्याचे एअर इंडियाने स्पष्ट केले आहे. असं असलं तरी या चाचणीमधून विमानात अपघाताच्या काही सेकंद आधी काय घडलं असावं याचा अंदाज बांधण्याइतका डेटा समोर आला आहे.
एअर इंडियाच्या वैमानिकांनी मुंबईतील सिम्युलेटर चाचणी केंद्रामध्ये अहमदाबादमधील विमान अपघातासंदर्भातील चाचणी केली. या चाचणीदरम्यान, सिम्युलेटरमध्ये विमानात अतिरिक्त वजन असताना विमानातील तापमान वाढवण्यात आले, तसेच विमानाचे पंख 50 फुटांवर असताना विमानाचा गियर डाऊन करत काय होऊ शकते, याचा शोध घेण्यात आला. मात्र, अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील विमान उडतच राहिल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले.
12 जून रोजी लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय-171 अहमदाबाद येथे उड्डाणानंतर लगेचच कोसळले. या घटनेत 241 जणांचा मृत्यू झाला, तर एक प्रवासी बचावला. या घटनेत एकूण 274 जणांचा मृत्यू झाला. विमान एका हॉस्टेलजवळ कोसळल्याने जमिनीवरील 33 जणांचाही मृत्यू झाला. 12 जून रोजी दुपारी 1.38 वाजता विमान क्रमांक एआय-171 ने उड्डाण केले आणि दुपारी 1.40 वाजता अपघात झाला. भारतीय विमान उड्डाण इतिहासातील नजीकच्या काळातील हा सर्वात भीषण अपघात ठरला आहे. या अपघातामागील नेमकी कारणं काय आहेत याचा शोध आता वेगवेगळ्या माध्यमातून केला जात आहे.
भारत सरकारबरोबरच एअर इंडिया आणि इतर संस्थांच्या माध्यमातून या विमानाच्या अवशेष आणि इतर परिस्थितीजन्य पुराव्यांचा माग घेत अपघाताची कारणं शोधली जात आहेत. याचाच भाग म्हणून ही सिम्युलेटर चाचणी करण्यात आली होती. ज्यामध्ये अनेक यंत्रणा खराब झाल्यानंतरही हे विमान उडत राहिल्याचं दिसून आलं आहे. मात्र विमानातील यंत्रणा नेमका कोणत्या कारणाने आणि कशा खराब झाल्या हे अद्याप समोर आलेलं नाही.