Raj Thackeray on Operation Sindoor : 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू - काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला केला. त्यामध्ये 27 जणांचा जीव गेला होता. या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी 6 मे मंगळवारी मध्यरात्रीनंतर भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 दहशतवादी हल्ला करुन बदला घेतला. यानंतर लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी ऑपरेशन सिंदूरचं कौतुक केलं आहे. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवरच हल्लाबोल केला आहे. एअर स्ट्राइक हे काही उत्तर नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. (Air strikes mock drills are not the answer Raj Thackeray opposes Operation Sindoor)
पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ''जेव्हा पहलगामवर हल्ला झाला तेव्हा मी पहिल्यांदा ट्विट केलं होतं, त्यात म्हटलं होतं की, ज्या कोणी हल्ला केला आहे, ते दहशतवादी जे कोणी असेल त्यांना धडा शिकवला पाहिजे. अत्यंत कठोर असा त्यांच्या पुढच्या पिढ्यांना लक्षात राहिला पाहिजे. पण दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं. युद्ध हे काही उत्तर नाही. अमेरिकेमध्ये हल्ला झाला, म्हणून त्यांनी जाऊन युद्ध नाही केलं.''
ते पुढे म्हणाले की, ''त्यांनी ते अतिरेकी ठार मारेल. ही अशी दुसऱ्या देशामध्ये युद्ध परिस्थिती आणायची. ते काय मॉकड्रिल करायचं आणि ते काय सायरन वाजवायचं, पण मुळात ही गोष्ट का घडली, हे पण आपण लक्षात घ्यायला हवं. थोडसं अर्तंमुख होऊन आपला विचार करायला पाहिजे. पाकिस्तान आधीच बरबाद झाले आहे, त्याला काय बरबाद करायचं? पण प्रश्न असा आहे की, ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला ते तुम्हाला सापडले नाही. ज्या ठिकाणी इतके वर्ष पर्यटक जात आहे तिथे सुरक्षा का नव्हती. मला वाटत हे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत. आपल्या देशामध्ये कोम्बिंग ऑपरेशन करुन त्यांना शोधून काढणे हे जास्त महत्त्वाचे आहे. हे एअर स्ट्राइक करून लोकांना भलत्या ठिकाणी भरकटून युद्ध हे काही उत्तर नाही. ''
''दुसरीकडे कसं झालं आहे ना, सरकारच्या चुका दाखवल्यास पाहिजे. ज्यावेळी हा प्रकार झाला तेव्हा पंतप्रधान सौदी अरेबियला होते. तो दौरा अर्धवट सोडून ते बिहारला आले. ही गोष्ट करायची गरज नव्हती. तिकडे अदानीच्या कोर्टचं उद्धाटन केलं. मग इकडे फिल्म जगतसाठी वेवचा कार्यक्रम केला. इतकी जर गंभीर परिस्थिती आहे, या गोष्टी टाळत्या आल्या असत्या. आणि त्याच्या नंतर येऊन मॉकड्रिल करायचं आणि मग काय एअर स्ट्राइक करायचं हे काही उत्तर नाही आहे. त्यापेक्षा ज्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला त्यांना शोधून काढावं. त्यांचा बंदोबस्त करणं आणि संपूर्ण देशामध्ये मॉकड्रिल करण्यापेक्षा कोम्बिंग ऑपरेशन करा. जिकडे जिकडे तुम्हाला माहिती आहे तिथे. मी महाराष्ट्र आणि मुंबईमधील पोलिसांनी सर्व गोष्टी माहिती आहे. त्यांचं मला कौतुक आहे. त्यांना कुठे आहे सुरु आणि काय घडतं आहे हे माहिती आहे. आज आपल्या देशातील प्रश्न संपत नाहीय आणि आपण काय युद्धाला सामोरे जातोय. मला वाटत ही काय योग्य गोष्ट नाही.,''