Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

रश्मी ठाकरेंकडे 'सामना'चे संपादकपद; अमृता फडणवीस म्हणतात...

आपल्या देशात महिलांचे आणि समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी महिलांची वरिष्ठ पदांवर नेमणूक होणे गरजेचे आहे.

रश्मी ठाकरेंकडे 'सामना'चे संपादकपद; अमृता फडणवीस म्हणतात...

मुंबई: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची निवड झाल्यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी रश्मी ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे. आपल्या देशात महिलांचे आणि समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी महिलांची वरिष्ठ पदांवर नेमणूक होणे गरजेचे आहे. जेणेकरून समाजाच्यादृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या मुद्द्यांसंदर्भात महिलांना मत व्यक्त करता येईल, असे अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून अमृता फडणवीस आणि शिवसेनेत ट्विटरवॉर सुरु आहे. अमृता फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केल्यामुळे शिवसेना डिवचली गेली आहे. त्यामुळे रश्मी ठाकरे यांनी संपादकपद स्वीकारल्यानंतर आगामी काळात 'सामना'तून या सगळ्याला कशाप्रकारे प्रत्युत्तर देण्यात येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

बाळासाहेब ठाकरे हे 'सामना'चे संस्थापक आणि पहिले संपादक होते. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर संपादकपदाची धुरा उद्धव ठाकरे यांच्याकडे आली आणि आता उद्धव ठाकरे यांनीही हे पद सोडल्यानंतर त्यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरे यांच्याकडे 'सामना'च्या संपादकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

उद्धव ठाकरे यांनी संपादक पद सोडल्यानंतर कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याकडे 'सामना'ची संपूर्ण जबाबदारी होती. तेच यापुढे 'सामना' चालवतील अशी शक्यता होती मात्र अनपेक्षितपणे रश्मी ठाकरे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली. आजच्या 'सामना'च्या प्रिंट लाईनमध्ये संपादक म्हणून रश्मी ठाकरे यांचा उल्लेख करण्यात आला आहे तेव्हा ही बाब समोर आली.

Read More