Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

'आदित्योदया'साठी वरळी मतदारसंघाचीच निवड का?

योग्य वेळ साधत आदित्य ठाकरे निवडणुकीला सामोरं जात आहेत. पण आदित्योदयासाठी वरळीच का? 

'आदित्योदया'साठी वरळी मतदारसंघाचीच निवड का?

मुंबई :  आदित्य ठाकरे मुंबईतल्या वरळी मतदारसंघातून पहिली वहिली निवडणूक लढणार आहेत. महाराष्ट्रातल्या २८८ मतदारसंघांपैकी वरळी मतदारसंघाचीच निवड आदित्य ठाकरेंसाठी का करण्यात आली? असं वरळीत नेमकं काय आहे. 

मंगळवारी शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आपला मुलगा आदित्य ठाकरे यांच्या हाती एबी फॉर्म सोपवला. ठाकरेंच्या पिढ्यांमधला असा हा पहिलाच प्रसंग... वडिलांनी मुलाला एबी फॉर्म देणं किंबहुना कुठल्याही ठाकरेंनी हाती एबी फॉर्म धरण्याचीही ही पहिलीच वेळ... योग्य वेळ साधत आदित्य ठाकरे निवडणुकीला सामोरं जात आहेत. पण आदित्योदयासाठी वरळीच का? याचीच ही कारणमीमांसा...

fallbacks
वडिलांकडून एबी फॉर्म स्वीकारताना आदित्य ठाकरे

शिवसेनेचे दबदबा

१९९० पासून वरळी मतदारसंघात शिवसेनेचा दबदबा आहे. वरळी १९९० ते २००९ पर्यंत सलग शिवसेनेचे दत्ताजी नलावडे निवडून यायचे. २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन अहिर आमदार झाले. पुन्हा २०१४ मध्ये शिवसेनेच्या सुनील शिंदेंनी वरळी काबीज केली.

नेते, कार्यकर्त्यांची मोठी फळी

याच मतदारसंघात सुनील शिंदे, किशोरी पेडणेकर, आशिष चेंबूरकर अशा नगरसेवकांसह मोठी फळी कार्यरत आहे.

लोकसभेत मताधिक्य

लोकसभा निवडणुकीत शिवसेना खासदार अरविंद सावंतांना या मतदारसंघात ३८ हजारांचं मताधिक्य मिळालंय.

अहिरांना घेण्याची खेळी

या मतदारसंघात प्रमुख अडसर होता तो सचिन अहिर यांचा... पण शिवसेनेनं अहिरांना शिवसेनेत घेऊन वरळीतून आदित्योदयाचं पक्कं करुन टाकलं.

विरोधकांकडे उमेदवार नाही

युतीच्या विरोधात लढण्यासाठी आघाडीकडे या मतदारसंघात उमेदवारच नाही. ही जागा बसपाला सोडण्याचा आघाडीचा विचार आहे. सुरेश माने उमेदवार असू शकतात, बुद्धिजीवी आणि पक्षात प्रभारीपदाची जबाबदारी असली तरी मुंबईकरांशी त्यांचा फारसा संपर्क नाही.

मराठी भाषकांचा दबदबा

वरळी मतदारसंघात मराठी भाषकांचा दबदबा आहे. त्यात कोल्हापूर, कोकण पट्ट्यातले सर्वाधिक मतदार आहेत.

मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहणारी शिवसेना आदित्योदयावेळी अर्थातच गाफील राहणार नाही... म्हणूनच मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर पोहोचण्यासाठीची पहिली पायरी वरळी ठरवण्यात आलीय.  

Read More