BDD Redevelopment Scheme : मागील बऱ्याच वर्षांपासून मुंबईतील विविध ठिकाणी असणाऱ्या बीडीडी चाळींमधील रहिवाशांना पुनर्विकासाठी प्रतीक्षा होती आणि अखेर आता हे पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागत असून, या रहिवाशांना हक्काच्या नव्या आणि तितक्याच प्रशस्त घरात जाण्याची संधी मिळण्याचा मुहूर्त नजीक आला आहे. ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून बीडीडीवासियांना त्यांच्या नव्या घराची चावी मिळणार असून, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच त्यासंदर्भातील बाबींचा आढावा नुकत्याच पार पडलेल्या वॉररुम बैठकीत घेतला.
सदर बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी 33 प्रकल्पांचा आढावा घेतला ज्यामध्या बीडीडी चाळी आणि त्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दासुद्धा केंद्रस्थानी होता. जिथं बीडीडी चाळीतील 9869 पुनर्विकास सदनिकांपैकी 3888 सदनिकांचं काम प्रगतीपथावर असून, 556 सदनिकाधारकांच्या हस्तांतरणाची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली.
हस्तांतरणासाठी तयार असणाऱ्या सदनिकांअंतर्गत नागरिकांना 500 चौरस फुटांच घर मिळणार असून, मुख्यमंत्र्यांनी नायगाव आणि ना.म. जोशी मार्गावर असणाऱ्या बीडीडी चाळींच्या सदनिकांचं वितरणही लवकरात लवकर केलं जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
सध्याच्या घडीला वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचं काम प्रगतीपथावर असून, त्यामागोमागच नायगाव इथं असणाऱ्या 3344 पैकी 1938 सदनिकांचं काम जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत यातील सदनिकांच्या चाव्या नागरिकांना दिल्या जाणार आहेत. तर, ना.म. जोशी मार्गावरील सुरू असणाऱ्या पुनर्विकासातून 342 सदनिकांचं हस्तांतरण डिसेंबर महिन्यापर्यंत केलं जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये अनेक बीडीडीवासियांना त्यांच्या नव्या घराची चावी मिळणार असल्यानं यंदाच्या वर्षअखेरपर्यंत अनेकांचाच स्वप्नांच्या घरात गृहप्रवेश झाला असेल असं म्हणणं गैर ठरणार नाही.
बीडीडी चाळ पुनर्विकास योजना म्हणजे काय?
बीडीडी चाळ पुनर्विकास योजना ही मुंबईतील जुन्या बीडीडी चाळींमधील रहिवाशांना नवीन, प्रशस्त आणि हक्काच्या घरांमध्ये पुनर्वसन करण्याची राज्य सरकारची योजना आहे. या योजनेंतर्गत वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जात आहे.
पुनर्विकास योजनेत कोणत्या ठिकाणांचा समावेश आहे?
ही योजना प्रामुख्याने मुंबईतील वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासावर केंद्रित आहे.
नवीन सदनिकांचे हस्तांतरण कधी सुरू होणार आहे?
ऑगस्ट 2025 च्या तिसऱ्या आठवड्यापासून बीडीडी चाळीतील रहिवाशांना त्यांच्या नव्या घरांच्या चाव्या मिळण्यास सुरुवात होईल. यानंतर सप्टेंबर आणि डिसेंबर 2025 मध्येही सदनिकांचे हस्तांतरण केले जाईल.