घरगुती वापराच्या आणि पिण्याच्या पाण्यासोबतच मंत्रालय, आमदार निवास, मेट्रो, विमानतळ, रस्तेकाम, इमारत बांधकामे इतर विकास कामांसाठी पुरवल्या जाणा-या वॉटर टॅकरची सेवाही प्रभावित होणार आहे. मुंबई पालिकेने केंद्रीय भूजल प्राधिकरणाबाबत नवे नियम लागू केल्याने मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे.
मुंबईतील विहीर आणि बोअर मालकांनी केंद्रीय भूजल प्राधिकरण नियमानुसार एनओसी घ्यावी, अन्यथा पाणीपुरवठा बंद होईल, अशी नोटीस मुंबई पालिकेकडून आल्याने अनेक विहीर आणि बोअरवेल मालकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बोअरवेल मालकांकडे एनओसी नसल्याचे आढळून आल्याने पाणीपुरवठा कसा करायचा? या चिंतेमुळे मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने या निर्णयाविरोधात वॉटर टँकर सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलाय
धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने आधीच मुंबईतील पाणीपुरवठा कमी झाला असून आता त्यात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 10 एप्रिलपासून मुंबईथील वॉटर टँकर सेवा बंद होणार आहे. मुंबई पालिकेने केंद्रीय भूजल प्राधिकरणाबाबत नवे नियम लागू केल्याने मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे.
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. सध्या या सात तलावांमध्ये फक्त ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे लवकरच मुंबईकरांवरील पाणी संकटाचे सावट अधिक गडद झाले आहे. मुंबईतील तलावांमधील पाणीपातळी कमी झाल्याने लवकरच पाणी कपातीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईतील पाणीबाणी टाळण्यासाठी केंद्रानं हस्तक्षेप करावा यासाठी आशिष शेलारांचं केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाला पत्र देण्यात आलं आहे. केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या परवान्याकरता महापालिकेकडून टॅकर चालकांची अडवणूक आणि छळ होत असल्याचाही आरोप आशीष शेलार यांनी केला आहे.