Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

भाजप प्रवक्त्या ते थेट हायकोर्ट न्यायाधीश..., कोण आहेत आरती साठे? महाराष्ट्राचं राजकारण तापलं!

तर आरती साठेंची नियुक्ती हे न्यायव्यवस्थेचं दुर्दैव असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. तर राजकीय नियुक्त्यांमुळे न्यायव्यवस्था कोलमडून पडेल असा हल्लाबोल वडेट्टीवारांनी केलाय. 

भाजप प्रवक्त्या ते थेट हायकोर्ट न्यायाधीश..., कोण आहेत आरती साठे? महाराष्ट्राचं राजकारण तापलं!

Who is Aarti Sathe : आरती साठे यांची हायकोर्टाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाल्यानंतर राज्यातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय.. आरती साठे या भाजपच्या प्रवक्त्या होत्या. राजकीय पदाधिकाऱ्याची न्यायाधीश म्हणून कशी नियुक्ती केली जाते असा सवाल करत विरोधकांनी आरती साठे यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतलाय. (BJP spokesperson to High Court judge who is  Maharashtra politics news in marathi)

आरती साठे यांची हायकोर्टाच्या न्यायाधीशपधी नियुक्ती झाल्यानंतर राज्याचं राजकारण मोठ्या प्रमाणावर तापल्याचं पाहायला मिळतंय. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमने आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती केल्यानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आक्षेप नोंदवला होता. 
सार्वजनिक व्यासपीठावरून सत्ताधारी पक्षाची बाजू मांडणा-या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं म्हणजे लोकशाहीवर केलेला सर्वांत मोठा आघात असल्याची पोस्ट रोहित पवार यांनी केली. तर आरती साठेंनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला होता असा दावा भाजपनं केला. मात्र न्यायाधीश नियुक्तीची प्रक्रिया ही दोन वर्षांपासून सुरु होते असं म्हणत भाजपचा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न रोहित पवारांनी केला. तर आरती साठेंची नियुक्ती सरन्यायाधिशांनी रद्द करण्याची मागणीही रोहित पवार यांनी केलीय. 

कोण आहेत आरती साठे ? 

- मुंबई उच्च न्यायालयाचे वकील
- मुंबई भाजपमध्ये 2017 पासून सक्रिय
- 2 फेब्रुवारी 2023 रोजी भाजपच्या प्रवक्तेपदी नियुक्ती
- वर्षभरानंतर जानेवारी 2024 मध्ये वैयक्तिक आणि व्यावसायिक कारण देत या पदाचा राजीनामा
- 6 जानेवारी 2024 रोजी भाजपच्या पक्षाच्या प्राथमिक सदस्यता आणि मुंबई भाजप कायदेशीर कक्षाच्या प्रमुख पदावरुन राजीनामा
- सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमनं मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती

तर आरती साठेंची नियुक्ती हे न्यायव्यवस्थेचं दुर्दैव असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. तर राजकीय नियुक्त्यांमुळे न्यायव्यवस्था कोलमडून पडेल असा हल्लाबोल वडेट्टीवारांनी केलाय. दरम्यान आरती साठेंच्या न्यायाधीशपदी झालेल्या नियुक्तीवर आक्षेप घेणा-या रोहित पवारांवर गुणरत्न सदावर्तेंनी टीका केलीय. रोहित पवारांची तक्रार हायकोर्टाच्या रजिस्टार जनरल यांच्याकडं केल्याचंही सदावर्तेंनी सांगितलंय.

आरती साठेंबाबत विरोधकांच्या आरोपांना भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उत्तर दिलंय. ट्विट करत त्यांनी काही सवालही उपस्थित केलेत. 

भाजपचं विरोधकांना प्रत्युत्तर 

राहुल गांधी यांच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने टिपणी काय केली आणि लगेच काँग्रेस आणि त्यांची इको सिस्टीम देशाच्या न्यायव्यवस्थेलाच दोषी ठरवायला निघाले आणि त्यातूनच आरती साठे यांच्या शिफारशीवर आक्षेप घेतला जातो आहे. 

खरंतर आरती साठे यांनी दोन वर्षांपूर्वीच भाजपाशी सर्व संबंध तोडले. पण तरी त्यांच्या पूर्वीच्या राजकीय संबंधांवर आक्षेप घेतला जात आहे. या देशात काँग्रेसचे खासदार मग न्यायाधीश मग परत खासदार झाल्याची उदाहरणं आहेत. बहरूल इस्लाम हे त्याचे एक उदाहरण त्याची माहिती आधीच्या ट्विटमध्ये दिली आहे अजूनही उदाहणे आहेत. 

तर आरती साठेंच्या नियुत्तीत काहीही गैर नसल्याचं घटनातज्ज्ञ अँड. सुधाकर आव्हाड यांनी म्हटलंय. न्यायाधीश नियुक्त करताना संबंधित व्यक्ती कोणत्या विचारसरणीची आहे हा मुद्दा कधीच विचारात घेतला जात नाही. याआधी काँग्रेसच्या काळातही अशा नियुक्त्याचा झाल्याचं आव्हाड यांनी म्हटलंय.

आरती साठे यांच्या न्यायाधीशपदी नियुक्त झाल्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत या नियुक्तीवर आक्षेप घेतलाय. थेट सरन्यायाधिशांनी या प्रकरणात लक्ष घालून नियुक्त रद्द करण्याची मागणी करण्यात आलीय. यावरून आता भाजप आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय.

Read More