Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

सोनू सूदला 'दत्तक' घेऊन भाजपकडून उत्तर भारतीय व्होटबँकेचे राजकारण- राऊत

सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातील काही घटक 'ठाकरे सरकार'ला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत होते.

सोनू सूदला 'दत्तक' घेऊन भाजपकडून उत्तर भारतीय व्होटबँकेचे राजकारण- राऊत

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अडकलेल्या मजूरांना गावी जाण्यासाठी मदत करणारा अभिनेता सोनू सूद याच्या कामाची प्रचंड चर्चा सुरु आहे. अनेकांना सोनू सूद रिअल लाईफ नायक वाटत आहे. मात्र, शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोनू सूदच्या एकूण कार्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सामनातील 'रोखठोक' या सदरात संजय राऊत यांनी सोनू सूदला दत्तक घेऊन भाजप नेते उत्तर भारतीय व्होटबँकेचे राजकारण करु पाहत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. 

या लेखात संजय राऊत यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊन काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण झाला. सूद याने म्हणे लाखो मजुरांना त्यांच्या घरी परराज्यात पोहोचवले. म्हणजे केंद्र व राज्य सरकारने काहीच केले नाही. यानंतर राज्यपालांनी त्याला थेट राजभवनावर बोलावून त्याचे कौतुक केले. महाराष्ट्रातील अनेक संस्था, व्यक्ती, पोलीस, पालिका कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका आणि बँक कर्मचारी जीवावर उदार होऊन कोरोनाशी लढत आहेत. मात्र, सोशल मीडियावर त्यांचे कधी कौतुक झाले नाही. हा सगळा घटनाक्रम संशय निर्माण करणारा असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

'महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान', मुख्यमंत्र्यांचा भाजपवर निशाणा

सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातील काही घटक 'ठाकरे सरकार'ला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत होते. भाजपमधील काही लोकांनी सोनू सूदला दत्तक घेतले. त्याला पुढे करुन उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला. सोनू सूद हा व्यावसायिक अभिनेता आहे. पैसे घेऊन संवाद फेकायचे हा त्याचा पेशा आहे. काही वर्षांपूर्वी 'कोब्रा पोस्ट'च्या स्टिंग ऑपरेशनमुळे त्याचा भांडाफोड झाला होता. पैसे मिळाले तर कुणाचाही मुखवटा लावून वावरायचे व प्रचार करायचा हे सूदसारख्यांचे धंदे आहेत, अशी जळजळीत टीका संजय राऊत यांनी केली आहे. 

तसेच उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल ही राज्ये बाहेरील लोकांना घ्यायला तयार नसताना सोनू सूद या सर्वांना नक्की कुठे पाठवत होता? लॉकडाऊन काळात इतक्या बसेसची नियमबाह्य व्यवस्था झालीच कशी? सोनू सूद जणू एक समांतर सरकार चालवत होता व त्याला हवे ते सर्व मिळत होते. सोनू सूद या महात्म्याचे नाव आता मोदींच्या 'मन की बात'मध्ये येईल. मग ते दिल्लीत पंतप्रधानांच्या भेटीस जातील. एक दिवस ते भाजपचे स्टार प्रचारक म्हणून मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये फिरताना दिसतील. तसा करार आधीच झाला असेल म्हणूनच सोनू सूद लॉकडाऊनचा मालामाल हिरो म्हणून तळपत राहिला. इतर सर्व हिरो लॉकडाऊन काळात घरीच बसले तेव्हा सोनू सूदचा अभिनय बहरुन निघाला, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.  

Read More