Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

कबुतरखान्यावर ताडपत्री! पर्यायी जागेसाठी लोढांचं महापालिकेला पत्र

कबुतरांना आहार देण्यासाठी पर्यायी उपाययोजना राबवाव्यात

कबुतरखान्यावर ताडपत्री! पर्यायी जागेसाठी लोढांचं महापालिकेला पत्र

सीमा आढेसह ब्युरो रिपोर्ट झी २४ तास मुंबई : मुंबईत कबूतरांना खाद्य पदार्थ टाकण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. यानंतर मुंबई महानगरपालिकेनं कबुतर खान्यावर ताडपत्री लावली आहे, ताडपत्रीनं संपूर्ण कबुतरखाना बंद करण्यात आला. यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची दखल घेत राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. 

मुंबई महापालिकेनं कारवाईचा बडगा उगारत दादरमधील कबुतरखाना तात्पुरता बंद केला आहे. मुंबई हायकोर्टाच्या निर्देशानंतर महापालिकेनं दादर कबुतरखाना बंद करण्याचं निर्णय घेतला आहे मंत्री मंगलप्रभात लोढा यांना मात्र आता माणसांपेक्षा कबुतरांचा कळवळा वाटू लागला आहे. कबुतरखाना बंद करू नका, या मागणीसाठी लोढा यांनी पुढाकार घेतला आहे. कबूतरखाना बंद करताना पक्षीप्रेमी, साधू संत आणि नागरिकांची भावना समजून घ्यावी, अशी विनंती करणारं पत्र मंगलप्रभात लोढा यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना लिहीलं आहे. 

कबुतरखाना कुठे स्तलांतरीत करावा? 

- कबुतरांना आहार देण्यासाठी पर्यायी उपाययोजना राबवाव्यात
- बीकेसी, रेसकोर्स, आरे कॉलनी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांसारख्या मोकळ्या जागांना सुरक्षित व नियंत्रित आहार क्षेत्र म्हणून निश्चित करण्याचा विचार करावा
- दीर्घकाळ चालत आलेल्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरांचा आदर राखून निर्णय घ्यावा
- जनभावनेची दखल घेत, सार्वजनिक आरोग्य आणि पक्षीप्रेम यामधील संतुलन साधणारा सुवर्णमध्य काढावा

मुंबई महानगरपालिकेनं दादरमधील ९२ वर्षे जुना कबुतरखाना तात्पुरता बंद केला आहे. दादरमधल्या कबुतरखान्यावर सध्या तात्पुरती ताडपत्री टाकण्यात आली आहे.  मुंबईतील कबुतरखाने बंद करावे अशी मागणी अनेक वर्षांपासून होतेय. कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे श्वसनाचे आजार होतात, असा आरोप आहे. अशा परिस्थितीत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कबुतरखाना बंद करण्याला विरोध केला आहे. 

FAQ: मुंबईतील कबूतरखाना बंद प्रकरण

1. मुंबईत कबूतरांना खाद्य टाकण्यावर का निर्बंध लावण्यात आले आहेत?
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, कबूतरांना खाद्य टाकण्यामुळे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होतो, विशेषतः कबूतरांच्या विष्ठा आणि पिसांमुळे श्वसनाचे आजार होण्याची शक्यता आहे. यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) कबूतरखान्यांवर कारवाई करत दादरमधील कबूतरखाना तात्पुरता बंद केला आहे.

2. दादर कबूतरखाना का बंद करण्यात आला?
दादर कबूतरखाना, जो 1933 पासून अस्तित्वात असलेला ग्रेड II हेरिटेज स्मारक आहे, तो उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद करण्यात आला. BMC ने याठिकाणी ताडपत्री लावून आणि कबूतरांना खाद्य टाकण्यास मनाई करणारे फलक लावून कारवाई केली आहे. यामागचे कारण म्हणजे कबूतरांच्या विष्ठेमुळे होणारे आरोग्य धोके आणि सार्वजनिक त्रास.

3. जैन समुदायाचा विरोध कशासाठी?
जैन समुदायाने कबूतरखाना बंद करण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे, कारण कबूतरांना खाद्य देणे त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा भाग आहे. त्यांनी BMC च्या कारवाईला "अमानवीय" आणि "धार्मिक स्वातंत्र्यावर आघात" असा ठपका ठेवला आहे. 7 ऑगस्ट 2025 रोजी उच्च न्यायालयाचा निर्णय प्रतिकूल आल्यास जैन मुनि निलेश यांनी दादर कबूतरखान्यावर अनिश्चित काळासाठी उपोषण करण्याची घोषणा केली आहे.

Read More