Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

जात पडताळणी प्रमाणपत्रबाबत मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत मोठी घोषणा

जात पडताळणी प्रमाणपत्रबाबत मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेशादरम्यान SEBC चे जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे सक्तीचे नाही. जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी या विद्यार्थ्यांना वाढीव मुदत दिली जाईल, अशी घोषणा उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत केली. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या SEBC च्या विद्यार्थ्यांना हा मोठा दिलासा आहे.

राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी औचित्याचा मुद्दाद्वारे हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. मराठा समाजातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याने त्यांना मराठा अरक्षणापासून वंचित राहावं लागत असल्याची बाब जयंत पाटील यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिली. जात पडताळणी प्रमाणपत्र मिळेपर्यंत व्हेरिफिकेशन टोकन नंबर ग्राह्य धरले जाव, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली. तसेच हा मुद्दा इतरही व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ग्राह्य धरला जावा अशी मागणी अजित पवारांनी केली.

याला उत्तर देताना उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मराठा विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. तावडे यांनी याबाबत विधानसभेत माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्र्यांची आज प्रवेश नियंत्रण समितीच्या अध्यक्षांसोबत बैठक झाली. या बैठकीला उच्च तंत्र शिक्षणमंत्री आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. SEBC प्रवर्गातील ज्या विध्यार्थ्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे. त्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती केली जाणार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती तावडे यांनी विधानसभेत दिली.

Read More