Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

साकीनाका प्रकरणी महिन्याभरात दोषारोपपत्र दाखल करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

तातडीने या प्रकरणी विशेष सरकारी अभियोक्तांची नेमणूक करून न्यायालयीन खटल्याची तयारी करण्याच्या सूचना

साकीनाका प्रकरणी महिन्याभरात दोषारोपपत्र दाखल करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुंबई : साकीनाका येथे महिलेवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिचा झालेला दुर्दैवी मृत्यू या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. या प्रकरणात एका महिन्याच्या आत आरोपीवर दोषारोपपत्र दाखल करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. तसेच तातडीने या प्रकरणी विशेष सरकारी अभियोक्तांची नेमणूक करून न्यायालयीन खटल्याची तयारी करावी असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिलेत. 

मुंबईची एक सुरक्षित शहर अशी प्रतिमा या एका घटनेमुळे डागाळणार नाही याची काळजी घेण्यासाठी महिलांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात पोलिसांनी अधिक जागरूक राहून उपाययोजना करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.  

या बैठकीला मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव गृह विभाग मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि मिलिंद भारंबे उपस्थित होते. 

महिलांची वर्दळ असलेली ठिकाणे पोलिसांनी नियमित गस्त वाढवावी. महिलांवर हल्ले होऊ शकतात किंवा त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न उदभवू शकतो अशी शहरांतील हॉटस्पॉट निश्चित करून याठिकाणी गस्त वाढवावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
  
महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे असलेल्या तसेच तशी पार्श्वभूमी असलेल्या संशयित गुन्हेगारांवर कडक लक्ष ठेवावे. तसेच गुन्ह्याची उकल होण्यात सीसीटीव्हीची महत्वाची भूमिका असते, त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील कॅमेरे शहरात उर्वरित महत्वाच्या ठिकाणी बसविण्याची कार्यवाही लगेच सुरु करावी. अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या आहेत.

Read More