CIDCO Homes : मुंबईच्या (Mumbai) कक्षा रुंदावत गेल्या आणि पाहता पाहता दूर वाटणारी (Navi Mumbai) नवी मुंबई या मुख्य मुंबई शहराच्या आणखी नजीक आली. वर्षामागून वर्षं उलटत असताना नवी मुंबईतसुद्धा व्यवसायकेंद्र स्थिरावली आणि या भागाचासुद्धा सर्वांगीण विकास झाला. Planned City असल्यामुळं रस्त्यांपासून पाणीपुरवठ्यापर्यंत आणि अर्थातच मोठ्या घरांपर्यंतच्या अनेक गोष्टींची पूर्तता याच नवी मुंबईत करण्यात आली. याच नवी मुंबईमध्ये आता सिडको (CIDCO)नं एका महत्त्वाच्या नियमामध्ये बदल केला आहे.
सिडकोनं नव्यानं बदल केलेल्या या नियमानुसार इथं मालमत्ता हस्तांतरणासाठीच्या रकमेत इथून पुढं 5 ते 10 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. सदर मालमत्तेचा आकार, त्याची पद्धत यावर ही वाढीव टक्केवारी अवलंबून असेल असं इथं सांगण्यात आलं आहे. मंगळवार, 1 एप्रिल 2025 पासून हे नवे बदल लागू करण्यात आले असून, नोंदणीकृत गृहनिर्माण संकुलांमधील घरं आणि व्यावसायिक गाळ्यांसाठी हस्तांतरणाच्या रकमेत 50 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
सिडकोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, CIDCO च्या नुकत्याच पार पडलेल्या एका नियामक मंडळ बैठकीबदरम्यान या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. जिथं नव्या आर्थिक वर्षापासून हे दर लागू असतील असं सांगणात आलं. हा निर्णय घेत असताना या भागात सध्या सुरू असणारी विकासकामं आणि एकंदर Real Estate चा आढावा घेण्यात आल्याची माहितीसुद्धा सिडकोच्या वतीनं देण्यात आली.
राहिला मुद्दा या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम कोणावर होणार, तर ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ, सीबीडी बेलापूर, कळंबोली, खारघर, पनवेल आणि उलवे येथील मालमत्ताविषयक व्यवहारांमध्ये हे वाढीव दर लागू करण्यात येतील, ज्यामुळं घर खरेदी आणि विक्री करणाऱ्यांवरही याचा थेट परिणाम होताना दिसेल ही बाब नाकारता येत नाही.
सदर बदलानंतर निवासी मालमत्ता हस्तांतरणासाठीची रक्कम 20 चौरस मीटरपर्यंतच्या मालमत्तांसाठीची फी 27000 ते 77000 रुपये प्रति चौरस मीटर इतकी असेल. 200 चौरस मीटरहून अधिक क्षेत्रफळाच्या मालमत्तांसाठी ही रक्कम 1,11,100 रुपये ते 2,31,000 रुपये प्रति चौरस मीटर दरम्यान राहणार असून मालमत्तेचा परिसर, पद्धत, श्रेणी यावरही ही रक्कम अवलंबून असेल.
40 चौरसमीटर पर्यंतच्या निवासी भूखंडांसाठी हस्तांतरणाची फी प्रति चौरस फूट 26,700 रुपये इतकी असेल. तर, 200 चौरस मीटरपर्यंतच्या व्यावसायिक मालमत्तेसाठी ही रक्कम 5,84,600 रुपये प्रति चौरस मीटर इतकी असेल अशी माहिती समोर येत आहे.