CIDCO Lottery 2025 : सिडको आणि म्हाडा (MHADA) च्या सोडतीला कायमच सामान्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. रिअल इस्टेट क्षेत्रातील घरांचे दर गगनाला भिडत असतानाच या संस्थांकडून सामान्यांची आवक लक्षात घेता विविध उत्पन्न गटांना अनुसरून घरांची आखणी करत सोडत काढली जाते. यावेळी मात्र सिडकोची सोडत प्रसिसादास अपवाद ठरली. कारण घरांचे वाढलेले दर, काही सुविधांची अनुपलब्धता अशा कारणांमुळे इच्छुकांनी सिडकोच्या या सोडतीकडे पाठ फिरवली. जवळपास 12000 घरं यामुळं अद्यापही विक्रीविनाच पडून असल्याचं वास्तव समोर आलं.
विक्रीविना उरलेल्या या तब्बल 12 हजार घरांना विकण्यासाठी सिडको पुन्हा एकदा गृहविक्री धोरणात काही बदल करण्याची चाचपणी करत असून, त्यामुळं घर घेऊ इच्छिणाऱ्यांना फायदा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या लागू असणाऱ्या नियमानुसार पती किंवा पत्नीच्या नावे नवी मुंबई क्षेत्पात एखादं घर असल्यास दुसरं घर खरेदी करता येत नाही. मात्र, या नियमात बदल करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे संकेत सूत्रांमार्फत मिळत आहेत. सोडतीला मिळालेला अल्प प्रतिसाद आणि शिल्लक घरांच्या विक्रीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
2017 ते 2022 दरम्यान सिडकोनं जवळपास 25000 घरं बांधली. ज्यापैकी 6 हजार घरांची विक्री अद्यापही झालेली नाही. तर, हल्लीच पार पडलेल्या 26 हजार घरांच्या योजनेतूनही 7000 घरं शिल्लक असल्यामुळं या घरांच्या विक्रीसाठी सिडको नव्यानं काही पर्यायांची चाचपणी करताना दिसत आहे.
सिडकोच्या वतीनं सोडत प्रक्रियेमध्ये अनेक नियम आणि अटी अर्जदारांसाठी लागू असतात. या नियमानुसार पती किंवा पत्नीच्या नावे नवी मुंबई शहरात एक घर असल्याच सिडकोचं घर घेता येत नाही. सामान्य आणि मध्यम उत्पन्न गटातील अनेकांसाठीच हा नियम घर खरेदीमध्ये अडचणी निर्माण करत असल्यानं आता आर्थिकदृष्ट्या खिशाला परवडणारं सिडकोचं घर खरेदी करता यावी यासाठी या नियमात बदल केला जाऊ शकतो.
घर खरेदीसंदर्भातील ही अट शिथिल करता येण्यासंदर्भात सिडकोनं विचारविनिमय सुरू केला असून, येत्या काळात ही अट शिथिल झाल्यास सामान्यांना सिडकोच्या सोडत प्रक्रियेतून सिडकोचं दुसरं घरही खरेदी करता येणार आहे. या माध्यमातून सिडकोची विक्रीअभावी शिल्लक असणारी घरं विकण्यासाठी प्रयत्न केला जाणर आहे.