Mumbai Local Train Update: मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने स्वयंचलित दरवाजा असणाऱ्या लोकल आणणार अशी घोषणा केली होती. त्यानुसार आता कुर्ला कारशेडमध्ये साध्या लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजा असलेला एक डबा तयार केला आहे. मुंबईकरांचा लोकलच्या दरवाज्यात उभे राहात जीवघेणा प्रवास टळणार आहे.
नागरिकांचा गर्दीतील जीवघेणा प्रवास जरी टळणार असला तरी गर्दीच्या वेळी हवा खेळती राहण्यासाठी, वायूविजन, विशेष अशी कोणतीही व्यवस्था या डब्यात नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. त्यामुळे साध्या लोकलमध्ये लटकंती बंद होणार असली तरी हवा खेळती राहण्यासाठी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी साध्या लोकलमध्येही स्वयंचलित दरवाजे बसविण्याचे काम चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीला (आयसीएफ) देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार कुर्ला कारशेडमध्ये सामान्य श्रेणीच्या एका डब्यात स्वयंचलित दरवाजे कार्यान्वित करण्यात आले.
जुन्या लोकलमध्ये प्रथम श्रेणीच्या डब्यात महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र विभाग करण्याकरिता जाळी बसवण्यात आली होती. दोन्ही बाजूने जाळी आणि मध्यभागी हवा येण्यासाठी मोकळी जागा अशी डब्याची विभागणी झाली होती. प्रवाशांनी हवा येत नसल्याच्या तक्रारी नोंदवल्यानंतर नव्या लोकलमध्ये जाळी हटवून डब्याच्या आतून दोन्ही बाजूला जोडणारा दांडा टाकण्यात आला. आता लोकल डब्याच्या दरवाज्यावर जाळीचा प्रयोग करण्यात आला आहे.
आयसीएफमध्ये काम सुरू अशा स्वयंचलित दरवाजे उघड-बंद आणि सुधारित वायूविजन वैशिष्ट्यांसह साधी लोकल जानेवारी, 2026 पर्यंत रुळावर आणण्याचे नियोजन आहे. त्याची जबाबदारी आयसीएफकडे देण्यात आली आहे. नोव्हेंबरपर्यंत पुन्हा डिझाइन केलेल्या साध्या लोकलचा पहिला नमुना अपेक्षित आहे. नव्याने येणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या वातानुकूलित असतील. साध्या लोकलचा नवीन आराखडा तयार करण्याचे काम आयसीएफमध्ये सुरू आहे.
दरवाजा उघडताना आणि बंद होताना अलार्मची व्यवस्था असून त्याचे नियंत्रण गार्डकडे असेल. रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आणि सीईओ सतीश कुमार सोमवारी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. ते या डब्याची पाहणी करणार आहेत. पाहणीनंतर डब्यांची मंजुरी व चाचणीबाबत निर्णय होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Q. मुंब्रा अपघात कधी घडला होता?
ANS: मुंब्रा रेल्वे अपघात 9 जून 2025 रोजी झाला होता
Q. मुंब्रा अपघातात किती जणांचा जीव गेला?
ANS:या अपघातात 5 प्रवासी लोकल ट्रेनमधून खाली पडल्याने मृत्युमुखी पडले
Q. स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल कधी सेवेत येणार?
ANS: स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल सामान्य लोकल 2026 मध्ये येणार