मनश्री पाठक, झी २४तास, मुंबई : मुंबईतील एका प्रकल्पावरून भाजपमध्ये वाद सुरु झाले आहेत. लवकरच मुंबईतील कुलाबा इथं नवीन रेडिओ जेट्टी बांधली जाणार आहे. स्थानिकांसह आमदार राहुल नार्वेकरांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. मात्र मंत्री नितेश राणेंनी या जेट्टीचं भूमिपूजन केलं आणि स्थानिक आणखीनच आक्रमक झालेत.
भाजपमध्ये अंतर्गत वादाची ठिणगी पडलीये त्याचं कारण ठरलीये, मुंबईतील कुलाबा जेट्टी...कुलाब्यातील अपोलो बंदर परिसरात बांधण्यात येणा-या रेडिओ क्लब जेट्टीवरून भाजपमधील नेतेमंडळींमध्ये वाद रंगण्याची शक्यता आहे. गेट वे ऑफ इंडिया येथील जलवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी अपोले बंदर इथं या नव्या जेट्टीचं काम सुरु झालं आहे.
मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणेंच्या हस्ते या बंदराचं भूमिपूजन पार पडलंय. मात्र या जेट्टीला भाजपचे आमदार राहुल नार्वेकर, माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर आणि कुलाबावासीयांनी विरोध केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी विधानसभेतही हा मुद्दा मांडला. योग्य तो निर्णय घेतला जाईल असं आश्वासनंही दिलं. मात्र त्याआधीच मंत्री नितेश राणेंनी भूमिपूजन केल्याने स्थानिक आणखी आक्रमक झालेत.
कुलाबामधील वाहतूक कोंडी आणि गर्दीच्या समस्येनं आधीपासूनच स्थानिक ग्रासलेत. त्यामुळे कुलाबावासीयांचा श्वास आणखी कोंडणारा हा प्रकल्प त्वरीत रद्द करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
एका बाजूला भाजपच्या आमदार आणि माजी नगरसेवकाचा या जेट्टीला विरोध आहे. मात्र मंत्री नितेश राणेंनी या जेट्टीला हिरवा झेंडा दाखवल्याने या प्रकल्पावरून भाजपमध्येच वाद रंगणार का हे पाहावं लागणार आहे.