Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मोठी बातमी: वरळीतील पोलीस कॉन्स्टेबलला कोरोनाची लागण

वरळी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरताना दिसत आहे. 

मोठी बातमी: वरळीतील पोलीस कॉन्स्टेबलला कोरोनाची लागण

मुंबई: राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच आता चिंतेत भर टाकणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. वरळीतील एका पोलीस कॉन्स्टेबलला (वय ४२) कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी निष्पन्न झाले. या पोलीस कर्मचाऱ्याला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्याला परदेश प्रवास किंवा कोणताही नातेवाईक कोरोनाग्रस्त असल्याची पार्श्वभूमी नाही. मात्र, तरीही या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण कशी झाली, याचा शोध घेतला जात आहे.

त्यामुळे आता वरळी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरताना दिसत आहे. कालच वरळीतील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. यानंतर वरळी-कोळीवाडा आणि आदर्शनगरमधील ८६ जणांना पोद्दार आयुर्वेदिक रूग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र, हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात होती. ही भीती आता खरी ठरताना दिसत आहे. 

तत्पूर्वी आजच धारावीत काम करणाऱ्या एका सफाई कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. हा सफाई कर्मचारीही वरळीतच राहणारा आहे. या सफाई कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना आणि त्याच्या संपर्कात आलेल्या २३ सहकाऱ्यांना होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. 

पालिकेने वरळी-कोळीवाड्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर हा परिसर सील केला होता. याठिकाणी नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव केला जात आहे. तसेच बॅरिकेटस लावून बाहेरच्या लोकांनाही या परिसरात येण्यास बंदी केली आहे. 

 

Read More