Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

महामुंबईत बनावट नोटांची घुसखोरी; 500 आणि 200 च्या नोटा वापरताना सावधान

भारतीय चलनी नोटांमध्ये बनावट नोटांचीही घुसखोरी होत असल्याचे समोर आले आहे.

महामुंबईत बनावट नोटांची घुसखोरी; 500 आणि 200 च्या नोटा वापरताना सावधान

मुंबई : भारतीय चलनी नोटांमध्ये बनावट नोटांचीही घुसखोरी होत असल्याचे समोर आले आहे. नवी मुंबईच्या सीबीडी बेलापूर परिसरात पोलिसांच्या गुन्हे शाखेने सापळा रचुन बनावट नोटा वटविणाऱ्यांना अटक केली आहे. या आरोपींचं नाव सलीम अली असरील हक (वय 30) होय. पोलिसांनी त्याच्याकडून 1 लाख 85 हजार रुपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.  आरोपीकडून अधिक चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी दिली आहे.

नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर परिसरात एक व्यक्ती भारतीय चलनातील 500 रुपयांच्या बनावट नोटा वटविण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे यांच्या पथकाने सीबीडी बेलापूर बस डेपोजवळ सापळा रचून आरोपी सलीम अली असरील हकला अटक केली.

तत्काळ त्याची झडती घेतल्यावर पोलिसांना 500 आणि 200 रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. या नोटांची किंमत 1 लाख 85 हजार रुपये इतकी होती. पोलिसांनी केलेल्या अधिकच्या तपासानंतर संबधित आरोपीने पश्चिम बंगालमधून  बनावट नोटा नवी मुंबई, ठाणे, मुंबई या भागात वटविण्यासाठी आणले असल्याचे स्पष्ट झाले. 

पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून यासंबधीत अधिकचा तपास सुरू आहे. बनावट नोटा वटविण्याची ही साखळी आहे का? यात आणखी आरोपींचा सहभाग आहे का? या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.

Read More