Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

आंघोळ घालताना रडल्याने मुंबईत 4 वर्षीय मुलाची हत्या; आरोपीला सूरतमधून अटक

Mumbai Crime News: या प्रकरणामध्ये मागील काही दिवसांपासून कांदिवली पोलीस तपास करत होते. पोलिसांनी यासाठी 200 सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले.

आंघोळ घालताना रडल्याने मुंबईत 4 वर्षीय मुलाची हत्या; आरोपीला सूरतमधून अटक

Mumbai Crime News: कांदिवलीमध्ये चार वर्षांच्या चिमुकल्याची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी सुरतमधून अटक केली आहे. कांदिवलीत रस्त्याच्या कडेला आईच्या कुशीत झोपलेल्या चार वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण करून त्याची निघृणपणे हत्या केली. त्यानंतर या मुलाचा मृतदेह रस्त्यावर फेकून आरोपी पसार झाला होता. या आरोपीला पोलिसांनी गुजरातमधून अटक केली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले. या आरोपीचं नाव अक्षय अशोक गरुड असं असून तो 25 वर्षांचा आहे. अक्षय हा मलाडमधील रहिवाशी असून त्याला कांदिवली पोलिसांनी सुरतमधून अटक केली आहे. मागील चार दिवस सातत्याने तपास करीत कांदिवली पोलिसांनी सुरत गाठलं. तब्बल 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज पडताळून पाहिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

नेमकं घडलं काय?

नालासोपारा येथे राहणारी 24 वर्षीय फातीमा ऊर्फ सोनी अन्सारी ही 4 वर्षांचा मुलगा अंश आणि 10 महिन्यांची मुलगी रेणू यांना घेऊन कांदिवलीतील इराणीवाडीमध्ये फुटपाथवर राहणाऱ्या आईकडे आली होती. 21 मार्चच्या रात्री फातीमा तिच्या मुलांबरोबर फुटपाथवर झोपलेली असताना सायकलवरून आलेल्या अक्षयने अंशला उचलून नेले. त्यानंतर अक्षयने अंशची हत्या करून मृतदेह येथून जवळच असलेल्या एका बांधकाम सुरु असलेल्या साइटजवळ फेकून पळ काढला. कांदिवली पोलिसांनी आता अक्षयविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. अक्षय हा मृत मुलाच्या वडिलांचा मित्र होता. तो खासगी कंपनीत नोकरी करायचा. तो अंशला अनेकदा त्याच्या दुचाकीवरून फिरायला घेऊन जात होता. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी अक्षयचा शोध सुरू केला. 

असं सापडलं सुरत कनेक्शन

आरोपीचा शोध घेण्यासाठी कांदिवली पोलिसांनी 200 ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले. यामध्ये कांदिवली, बोरीवली, मालाड, अंधेरी, सांताक्रुझ, विरार आणि गुजरातमधील सुरत येथील सीसीटीव्ही फुटेजचा समावेश होता. या तपासामधून सदर प्रकरणाचं सुरत कनेक्शन समोर आले. पथकाने सुरतमध्ये सापळा रचून अक्षयला अटक केली. 

आंघोळ घालताना रडला म्हणून मारल्याचा दावा 

मुलाला फिरायला नेण्यासाठी आणले होते, असा दावा अक्षयने अटक केल्यानंतर केला आहे. आंघोळ घालत असताना अंश रडू लागला. अखेर रागाच्या भरात अक्षयने अंशला पाण्यात बुडवून ठार मारल्याची कबुली दिली आहे. पण, मुलाचे अपहरण करण्यामागे खरं कारण काय आहे आणि त्याची हत्या करण्यामागे नेमके कोणते कारण निमित्त ठरले यांचं गूढ कायम असून पोलीस त्याचाच शोध घेत आहेत.

Read More