Can Airplane Systems Hack By Cyber Attack: राज्यसभेचे खासदार तसेच उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी 241 प्रवाशांनी प्राण गमावलेल्या अहमदाबाद विमान अपघातासंदर्भात बोलताना सायबर हल्ल्याची शक्यता व्यक्त केली आहे. अचानक दोन्ही इंजिनं बंद कशी पडली? असा सवाल उपस्थित करत राऊतांनी यापूर्वीही असे हल्ले झाल्याचं म्हटलं आहे. संजय राऊत यांनी सायबर हल्ल्यासंदर्भात उपस्थित केलेल्या शंकेनंतर अहमदाबाद विमान अपघात प्रकरणाकडे वेगळ्याच नजरेतून पाहिलं जात असताना सायबर तज्ज्ञांनी या प्रकरणामध्ये राऊत यांनी उपस्थित केलेल्या शंका अगदीच चुकीची नसल्याचं सूचित केलं आहे. सायबर हल्ल्याच्या माध्यमातून विमानावर नियंत्रण मिळवता येतं असं सायबर तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 'झी 24 तास'शी बोलताना सायबर एक्सपर्ट तन्मय दीक्षित यांनी विमानं यापूर्वी अशाप्रकारे हॅक करण्यात आल्याचं सांगितलं आहे. हे हॅकिंग नेमकं कसं होतं आणि त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी काय केलं पाहिजे याबद्दलही दीक्षित यांनी भाष्य केलं आहे.
तन्मय दीक्षित यांनी सायबर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विमान अपघाताबद्दल बोलताना तांत्रिक बाबी समजून सांगितल्या. सायबर एक्सपर्ट असलेल्या तन्मय दीक्षित यांनी, "विमानावर सायबर हल्ला होऊ शकतो कारण ते एक मानवनिर्मित यंत्र आहे," असं म्हटलं आहे. हे हॅकिंग कसं केलं जातं याबद्दल बोलताना, "विमानातील यंत्रांच्या सुरक्षेसाठी सिक्युरिटी इन्स्क्रीप्शन सेटींग केलेले असतात. या इन्स्क्रीप्शनच्या सेटींगचा अॅक्सेस हॅकर्स, क्रिमिनल्सला मिळाले तर ते रिमोटली हाताळता येऊ शकतात," असं स्पष्ट केलं. म्हणजेच त्रयस्त ठिकाणावरुन विमानातील यंत्रणा हातळण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं दीक्षित यांनी सूचित केलं आहे.
पुढे बोलताना, "विमानात ऑटो पायलेट मोड असतो. हा ऑटो पायलेट मोड अॅक्सेस करण्यासाठी हॅकर्स, क्रिमिनल्स ही सिस्टीम रिमोटली ब्रेक करु शकतात किंवा त्यावर हल्ला करु शकतात," असं तन्मय दीक्षित यांनी म्हटलं आहे. तन्मय दीक्षित यांनी अशाप्रकारचं हॅकिंग कसं रोखता येईल याबद्दलचीही माहिती दिली आहे.
नक्की वाचा >> 'अहमदाबाद एअरपोर्ट कोणाच्या...'; अहमदाबाद विमान अपघातासंदर्भात संजय राऊतांकडून प्रश्नांचा पाऊस
"हे (विमानातील यंत्रणांचं हॅकिंग) टाळण्यासाठी सिक्युरीटी ऑडिटींग करणं, पेनिट्रेटींग टेस्टींग करणं हे अतिशय आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला याच्या आधीसुद्धा अशाप्रकारे रिमोटली हॅकिंग करण्यात आलेलं आहे. विमानासंदर्भातील यंत्रणा सहज लक्षात येऊ शकते. रडार सिस्टीम असो किंवा एरोप्लेन असो याच्या सिग्नल सिस्टीम किंवा ऑन ऑफ सिस्टीम असो या नीट तपासणं, ऑडिट करणं हे खूप आवश्यक असतं," असंही तन्मय दीक्षित यांनी म्हटलं आहे.