Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

एका चप्पलेमुळे सापडला ज्वेलर्सवर दरोडा टाकणारा चोर; मुंबई पोलिस UP ला पोहचले अन्...

Mumbai Police Crime Case: मुंबई पोलिस दलातील अधिकाऱ्यांनी केलेल्या या तपासाचं सध्या सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसतंय.

एका चप्पलेमुळे सापडला ज्वेलर्सवर दरोडा टाकणारा चोर; मुंबई पोलिस UP ला पोहचले अन्...

Mumbai Police Crime Case: मुंबई पोलिसांनी एका अत्यंत किचकट प्रकरण यशस्वीपणे सोडवलं आहे. महिन्याभरापासून एका ज्वेलरी शॉपमधील चोराचा माग काढणाच्या प्रयत्न असलेल्या मुंबई पोलिसांच्या टीमला आरोपी थेट उत्तर प्रदेशमध्ये सापडला आहे. मालाड पोलिसांनी ही कामगिरी केली असून त्यांनी केवळ चपलांवरून चोराला पकडलं आहे. फक्त चपलांच्या मदतीने चोराला ओळखून त्याला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आल्याबद्दल पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. सुरुवातीला पोलिसांनी चोराची ओळख पटविण्यासाठी फेशियल रेकग्निशन सिस्टीम वापरली होती.  मात्र त्यात पोलिसांना यश आलं नाही. अखेर कपडे, बदलेल्या मार्गांचा वापर करुनही केवळ चपलांच्या मदतीने चोराला पोलिसांनी अटक केली. अटकेत असलेल्या व्यक्तीचं नाव मुकीम मतीन खान असं असून तो 30 वर्षांचा आहे.

एसी युनिट काढून ज्वेलरी शॉपमध्ये प्रवेश

मालाड पश्चिम येथील एका ज्वेलरी शॉपमध्ये चोरी केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी 26 मे रोजी या व्यक्तीला अटक केली होती.  घाटकोपर येथील रहिवासी असलेला खान हा कारागीर आहे. मात्र त्यापूर्वीही त्याने अशीच चोरी 28 एप्रिल रोजी केली होती. खानने मालाड स्टेशनसमोरील रतनकला ज्वेलरी शॉपमध्ये मागील बाजूस असलेल्या विंडो एसी युनिटच्या मार्गाने दुकानात घुसून अंदाजे 4 लाख 99 हजार रुपयांचे दागिने चोरले होते. मे महिन्यात पुन्हा चोरीचा प्रयत्न केल्याच्या रेकॉर्डच्या मदतीनेच त्याला एप्रिलमधील चोरी प्रकरणात अटक करता आली.

दिशाभूल करण्यासाठी आरोपीने काय केलं?

28 एप्रिल रोजी झालेल्या चोरीच्या घटनेनंतर दागिन्यांच्या दुकानाच्या मालकाने दिलेल्या तक्रारीनंतर, मालाड पोलिसांनी 29 एप्रिल रोजी बीएनएसच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पोलिसांपासून वाचण्यासाठी वारंवार कपडे बदलत असे. अटक टाळण्यासाठी तो नेहमी प्रवासाचे मार्ग बदलत होता. उत्तर प्रदेशला पळून जाण्यापूर्वी पोलिसांनी दिशाभूल करण्याच्या उद्देशाने तो घाटकोपरलाही आला होता. झोन 11 चे डीसीपी आनंद भोईटे, एसआय विजय पन्हाळे, पीएसआय तुषार सुखदेव आणि एपीआय दीपक रेवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या चोराचा माग काढला जात होता.

सीसीटीव्ही फुटेजमधून तपासणी

“सुरुवातीला आरोपीबद्दल कोणतेही ठोस पुरावे नव्हते. दागिन्यांच्या दुकानातील आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. मात्र रात्रीच्या वेळी कमी प्रकाशामुळे त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. असं असतानाही पोलिसांनी प्रयत्न सोडले नाहीत. तपास पथकाने आरोपीचा पळून जाण्याचा मार्ग निश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करून त्याच्या हालचालींचा मागोवा घेण्याचं काम सुरु ठेवलं,” असे एका तपास अधिकाऱ्याने सांगितले.

फेशियल रेकग्निशन सिस्टममधून मिळाला फोटो

तपासादरम्यान असं आढळून आलं की, आरोपीने मालाड स्टेशनवरून अंधेरीला जाणारी ट्रेन पकडली. नंतर असल्फा येथे मेट्रोने त्यानंतर बस आणि शेवटी ऑटो-रिक्षाने प्रवास केला. पुढील तपासामध्ये असे दिसून आले की त्याने गुन्हा करण्याआधी दागिन्यांच्या दुकानात पोहोचण्यासाठी याच मार्गाचा वापर केला होता. पोलिसांनी रेल्वे स्टेशन, मेट्रो आणि बस स्टॉपसह मार्गावरील प्रत्येक संभाव्य ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज गोळा केले. अंधेरी स्टेशनवरून मिळालेल्या फेशियल रेकग्निशन सिस्टम (एफआरएस) द्वारे तपासणी करण्यात आली. ओळख पटविण्यासाठी सर्व पोलिस स्टेशनमध्ये हा फोटो पाठवण्यात आला.

अन्य एका प्रकरणात आरोपी असल्याचं उघड

वर्सोवा पोलिसांनी याच व्यक्तीने यापूर्वी एका दुकानात अशीच चोरी केली असल्याची माहिती दिली. पोलिसांना दिशाभूल करण्याच्या प्रयत्नात, खानने त्याचे कपडे आणि प्रवासाचा मार्ग बदलला होता. परंतु तो चप्पल बदलण्यास विसरला होता. त्याची हीच किरकोळ चूक महत्त्वाची ठरली. सीसीटीव्ही फुटेजमधील आयडेंटीफिकेशन म्हणून वेगळ्या फुटेजमधून चप्पलेच्या माध्यमातून माग काढत पोलिसांनी त्याचा घाटकोपरपर्यंत पाठलाग केला. तपासात सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "पकडले जाऊ नये यासाठी त्याने सर्व प्रयत्न करूनही, त्याच्या चप्पलांमुळे तो अडकला."

मोबाईलवरुनही लोकेशन सापडेना कारण...

"आरोपीचे मोबाइल डेटा रेकॉर्ड आणि टॉवर लोकेशनवर पोलिसांचं लक्ष होतं. मात्र त्याचा फोन बंद होता. असं दिसून आलं की आरोपी वाय-फाय नेटवर्क वापरून व्हॉट्सअप कॉल करत होता. ज्यामुळे पारंपारिक मोबाइल ट्रॅकिंगद्वारे त्याचे अचूक स्थान शोधणे कठीण झालं," असे अधिकाऱ्याने सांगितलं. अखेर तांत्रिक देखरेखीवरून असे दिसून आले की आरोपी उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात वास्तव्यास आहे. सुरुवातीला त्याच्या गावाच्या पत्त्याबद्दल अचूक माहिती नव्हती. मात्र तरीही मुंबईहून पोलिसांचे एक पथक तात्काळ उत्तर प्रदेशला रवाना करण्यात आले.

आरटीओ डेटाबेसमधून शोधला नंबर अन् पत्ता

“पोलिसांनी वाहन पोर्टलवरून आरोपीचा मोबाईल नंबर शोधला. आरोपीच्या नावाने नोंदणीकृत एक मोटारसायकल आणि सविस्तर पत्ता सापडला,” असे दुसऱ्या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. वाहन डेटाबेसच्या माध्यमातून मिळालेल्या पत्त्याचा वापर करून, पोलिस पथकाने आरोपीला ताब्यात घेतले.

गुन्ह्याची कबुली अन् पैशांचं काय केलं हे सांगितलं

“चौकशीदरम्यान, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आणि सांगितले की त्याने चोरीचे दागिने विकून 2 लाख रुपयांची मोटारसायकल खरेदी केली होती आणि उर्वरित रक्कम खर्च केली होती,” असे अधिकाऱ्याने सांगितले. “अटक केल्यानंतर, आरोपीला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले आणि ट्रान्झिट रिमांडवर मुंबईला आणण्यात आले. नंतर त्याला गुरुवारी बोरिवली न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला पोलिस कोठडी सुनावली आहे,” असे मालाड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय पन्हाळे यांनी सांगितलं.

Read More