BDD chawls redevelopment: हक्काच्या आणि स्वप्नांच्या घरांचे स्वप्न पाहणाऱ्या बीडीडीकरांसाठी एक खुशखबर समोर येतेय. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा पहिला टप्पा 15 ऑगस्टपर्यंत हत्तांतरित होणार आहे. म्हणजेच बीडीडीकरांना लवकरच घरांच्या चाव्या मिळणार आहेत. नव्या घरातच गणेशोत्सव साजरा होण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील घरे 15 ऑगस्ट 2025 पर्यंत रहिवाशांना हस्तांतरित केली जाणार आहेत. या प्रकल्पांतर्गत वरळी, नायगाव आणि अन्य परिसरातील जुन्या चाळींचे आधुनिक इमारतींमध्ये रूपांतर केले जात आहे.
पहिल्या टप्प्यात सुमारे 3,000 रहिवाशांना नवीन आणि सुसज्ज घरे मिळणार आहेत. या घरांमध्ये आधुनिक सुविधा जसे की स्वच्छ पाणी, वीज, स्वच्छतागृहे आणि लिफ्ट यांचा समावेश आहे. प्रकल्पामुळे रहिवाशांचे राहणीमान सुधारण्याबरोबरच शहरातील जुन्या वास्तूंचे आधुनिकीकरण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबईतील जुन्या चाळींच्या पुनर्विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.
बीडीडी चाळ पुनर्विकास हा अत्यंत महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. ब्रिटिशांच्या काळातील चाळी असल्यामुळं त्यांना ऐतिहासिक महत्त्वदेखील होते. या चाळी जुन्या आणि धोकादायक ठरवल्यानंतर बीडीडी चाळींच्या पुनर्रचना करण्याच्या उद्देशाने प्रकल्पाला गती आली होती. बीडीडीच्या नव्या घरांचा ताबा कधी मिळणार हा प्रश्न कित्येक दिवसांपासून सातत्याने विचारला जात होता. मध्यंतर पाडव्याचा मुहूर्तदेखील हुकला होता. त्यामुळं आता गणेशोत्सवाच्या मुहूर्तावरतरी बीडीडीकरांना नव्या घरात प्रवेश करता येणार आहे.
दरम्यान, वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही यासंदर्भात एक ट्विट केले होते. त्यांनी प्रकल्पातील नागरिकांना लवकरात लवकर ताबा देण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्यांनी म्हटलं आहे की, ' माझ्या वरळी मतदारसंघातील बी.डी.डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज-1 चे काम पूर्णत्वास आले असून, ‘डी’ आणि ‘ई’ विंगसाठी भोगवटा प्रमाणपत्र देखील प्राप्त झाले आहे. त्यामुळे रहिवाशांना लवकरात लवकर नवीन सदनिकांचा अधिकृत ताबा आणि चाव्या देण्यात याव्यात ह्यासंदर्भात महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांच्यासोबत पत्रव्यवहार केला. '