Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मैत्रिणीची हत्या करून मित्राने रचला आत्महत्येचा बनाव, CCTV फुटेजनं फोडलं बिंग

Mumbai Crime News: मुलीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी मुलाने मुलीने अभ्यासाच्या तणावातून मुलीने 30- 31 मजल्याच्या मधील खिडकीतून उडी घेत आत्महत्या केल्याचे सांगितले होते. 

मैत्रिणीची हत्या करून मित्राने रचला आत्महत्येचा बनाव, CCTV फुटेजनं फोडलं बिंग

Mumbai Crime News: भांडुपमध्ये 15 वर्षीय मुलीने 24 जून रोजी इमारतीतून खाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासातून ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं समोर आलं आहे. डेटिंगवरून झालेला वाद विकोपाला जाऊन 16 वर्षीय मुलाने इमारतीच्या टेरेसवरून 15 वर्षीय मुलीला ढकलून दिल्याची सदर घटना घडल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांनी दिलेल्या जबाबामुळे आरोपीचं बिंग फुटलं. 

नेमकं काय घडलं?

मुलुंडमध्ये आईसोबत राहणारी 15 वर्षीय मुलगी 24 जूनच्या संध्याकाळी तिच्या 16 वर्षीय मित्राला भेटण्यासाठी भांडूपच्या महिंद्रा स्प्लेंडर सोसायटीत आली होती. मुलाने तिला डी विंग इमारतीच्या छतावर नेले. छतावरील पाण्याच्या टाकीजवळ दोघे गप्पा मारत असताना, मुलीने त्याला डेटिंगसाठी विचारले. दोघांमध्ये डेटिंगवरून वाद झाला. वादानंतर मुलाने तिला धक्का दिला. त्यात इमारतीवरून खाली पडून मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर मुलगा काही घडले नसल्याच्या आविर्भावात फिरला आणि घरी गेल्याचे तपासात समोर आले. 

मुलीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी मुलाने मुलीने अभ्यासाच्या तणावातून मुलीने 30- 31 मजल्याच्या मधील खिडकीतून उडी घेत आत्महत्या केल्याचे सांगितले होते, पण त्याने केलेला गुन्हा तो फार काळ लपवू शकला नाही. भांडूप पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस आयुक्त जितेंद्र आगरकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून घटनास्थळावरून पुरावे ताब्यात घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला. इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजसह दोन्ही मुलांच्या मोबाइलची तपासणी सुरू केली. 

इमारतीच्या सुरक्षा रक्षकांसह रहिवासी, आरोपी मुलाचे आई-वडील, मुलीची आई, दोन्ही मुलांचे मित्र-मैत्रीण यांच्याकडे चौकशी केली. आरोपी मुलाची त्याच्या वडिलांच्या समक्ष 24, 28, 29 आणि 30 जून रोजी सखोल चौकशी करण्यात आली. 29 जून पर्यंत तो 'मी काही केले नाही हेच सांगत होता. 

कसा झाला प्रकरणाचा उलगडा?

खाली पडलेल्या मुलीचा मोबाइल ई विंग जवळ मुलांना सापडला. सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या माहितीवरून हा तरुण खोटे बोलत असल्याचे स्पष्ट झाले, घटनेनंतरच्या संशयास्पद हालचालींमुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले. तपासात मुलानेच तो लांब फेकल्याचे उघड झाले. मुलीने इमारतीमध्ये प्रवेश करताना व्हिझिटर बुकमध्ये दीपाली नाव लिहून आरोपी मुलाचा मोबाइल नंबर नोंद केला होता. आरोपी मुलाने खाली आल्यानंतर तो नंबर आणि नोंदणी बुकमध्ये खाडाखोड केली होती. 

मुलाने दिलेला जबाब आणि रहिवाशांनी दिलेल्या जबाबाने मुलावरील संशय आणखी दाट झाला. चौकशीत घटनेच्या दिवशी दोघांमधील भांडणाचा आणि जोरात ओरडल्याचा आवाज ऐकल्याचे एका रहिवाशाने सांगितले. पायऱ्यांवरून धावत येणाऱ्या मुलाने आवाजाबाबत काही माहिती नसून आपण मित्राला भेटायला आल्याचे या रहिवाशाला सांगितले. हा जबाब आणि मुलाच्या जबाबातील तफावत याने अखेर याप्रकरणाचा उलगडा झाला. सोमवारी रात्री मुलाने गुन्ह्यांची कबुली दिली. सदर मुलाला डोंगरी बालसुधारगृहात पाठविले आहे.

Read More