Siddhivinayak Temple Trust: 8 मार्च रोजी जगभरात महिला दिन साजरा केला जातो. घरापासून कार्यालयापर्यंत आपल्यासोबत असणाऱ्या महिलांचा सन्मान करण्याचा हा दिवस असतो. या पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक मंदिर न्यासनेदेखील अनोखा उपक्रम सुरु करणार आहे.
8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. महिला दिनी जन्मलेल्या मुलींना सिद्धिविनायाक मंदीर न्यासकडून खास गिफ्ट देण्यात येणार आहे. ज्या मुलींचा जन्म 8 मार्चला होईल त्या मुलींच्या अकाऊंटवर मंदिर न्यासकडून 10 हजार रुपये फिक्स डिपॅाझिट स्वरुपात देण्यात येणार असल्याची माहिती श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासचे विश्वस्त राहूल लोंढे यांनी दिली.
राहुल लोंढे यांच्याकडून मंदिर ट्रस्ट अर्थसंकल्प सादर होताना सूचना मांडण्यात आला. यानंतर सिद्धिविनायक मंदिराच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर करण्यात आला.अंतिम निर्णयासाठी मंदीर ट्रस्टकडून हा प्रस्ताव सरकारकडे पाठवला जाणार आहे.
मंदिराचा अर्थसंकल्प सादर झाला. यात मी सूचना मांडली. बेडी बचाव, बेटी बचाव हे सरकारचे धोरण आहे. 8 मार्च रोजी महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात जन्म झालेल्या मुलींच्या नावे बॅंक अकाऊंट उघडून त्यात 10 हजार रुपये टाकण्यात येणार आहेत, अशी माहिती राहूल लोंढे म्हणाले. श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना असे याचे नाव असेल. डायलेसिस सेंटर, पुस्तक पेढी अशा सामाजिक उपक्रमात मंदिर सहभाग घेत असते. शासन मान्यतेनंतर या योजनेचे निकष जाहीर होतील, असेही राहुल लोंढे पुढे म्हणाले.