Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांची आता गय नाही- अजित पवार

निर्बंध मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करणारच

रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांची आता गय नाही- अजित पवार

मुंबई: कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग रोखण्यासाठी सरकारने घातलेल्या निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्या व रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की,  रस्त्यांवर अकारण दिसणाऱ्या आणि प्रवास करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील. तसेच गरज पडल्यास राज्यात संचारबंदीही लागू केली जाईल.

घराबाहेर पडून रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांमुळे कोरोनाची साथ पसरण्याचा धोका वाढला आहे. रस्त्यावर गर्दी करणाऱ्या मोजक्या ‘निर्बुद्धां’मुळे राज्यातील जनतेच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. राज्य शासनाने आतापर्यंत संयमाने घेतले, परंतु हा संयम कायम ठेवणे यापुढे शक्य नाही. बंदी आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करणारच, असा असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले. ‘कोरोना’ची साथ पसरु नये यासाठी शासन आवश्यक सर्व पावले उचलेल, परिस्थितीचा आढावा घेऊन संपूर्ण राज्यात संचारबंदीचा निर्णय घेतला जाईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

तसेच विलगीकरण केलेल्या संशयितांनी निर्बंध मोडून लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करु नये. तसे केल्यास त्यांच्यावरही गुन्हे दाखल करुन कारवाई करु, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

सध्या राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दुसऱ्या टप्प्यात आहे. हा प्रादुर्भाव तिसऱ्या टप्प्यात गेल्यास राज्यासमोर गंभीर संकट उभे राहू शकते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबईतील लोकलसेवा सामान्यांसाठी बंद केली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या संस्थांच्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने प्रवास करण्याची मुभा आहे. तर खासगी कंपन्यांनाही 'वर्क फ्रॉम होम'चे आदेश देण्यात आले होते. मात्र, तरीही अनेक नागरिक रस्त्यांवर विनाकारण गर्दी करताना दिसत आहेत.

 

Read More