Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

...म्हणून पत्नीला 5 लाख नाही 1 कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्या; मुंबईतील कोर्टाचा पतीला आदेश

Court Case Domestic Abuse Victim Compensation: न्यायालयाने आधी दिलेल्या निर्णयामध्ये बदल करताना पीडितेला मोठा दिलासा दिला आहे.

...म्हणून पत्नीला 5 लाख नाही 1 कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्या; मुंबईतील कोर्टाचा पतीला आदेश

Court Case Domestic Abuse Victim Compensation: मुंबईमधील सत्र न्यायालयाने घरगुती हिंसाचारासंदर्भातील प्रकरणात दिलेला एक निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरतोय. न्यायालयाने पीडित महिलेला देण्यात येणाऱ्या भरपाईची रक्कम पाच लाखांवरुन थेट एक कोटी रुपयांपर्यंत वाढवली आहे. महिलेला दिलासा देताना न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. मागील दोन दशकांपासून अधिक काळ ही महिला घरगुती हिंसाचार सहन करत होती. या महिलेचा पती कोट्यधीश असल्याचं समोर आल्यानंतर न्यायालयाने तिला दिल्या जाणाऱ्या रक्कमेमध्ये तब्बल 95 लाखांची वाढ करण्याचे आदेश दिलेत.

पतीला तो दावा सिद्धच करता आला नाही

या प्रकरणामधील पीडित महिलेने जवळपास 20 वर्ष घरगुती हिंसाचार सहन केला. या महिलेचा पती तसेच सासरे हे कोट्यधीस असल्याची माहिती समोर आली आहे. या साऱ्या बाबींचा विचार करुन दंडाधिकारी न्यायालयाने पीडितेला सध्या दिली जाणारी नुकसानभरपाईची रक्कम फारच कमी असल्याचं निरिक्षण नोंदवलं. या महिलेला पाच लाख रुपयांची रक्कम नुकसानभरपाई म्हणून दिली जात होती. मात्र या प्रकरणातील पती हा कोट्यधीश असून तो 'पैशात लोळतोय' असं निरिक्षण न्यायालयाने नोंदवलं. खरं तर पतीने आपण आर्थिक अडचणीत असल्याचा दावा न्यायालयासमोर केलेला. मात्र त्याला तो पुराव्यानिशी सिद्ध करता आला नाही. 

20 वर्ष शारीरिक आणि मानसिक छळ

सर्व परिस्थितीचा सारासार विचार करुन अतिरिक्त सत्र न्यायाधीश समीर अन्सारी यांनी पाडितेला दिली जाणारी नुकसानभरपाईची रक्कम पाच लाखांऐवजी एक कोटी असावी असे आदेश दिले आहेत. हा या महिलेला मिळालेला फार मोठा दिलासा असल्याचं सांगितलं जात आहे. सदर प्रकरणात सादर केलेले पुरावे आणि तथ्य लक्षात घेता जवळजवळ 20 वर्षांच्या वैवाहिक जीवनात पीडितेचा तिच्या पतीने मारहाण, टोमण्यांसारख्या घरगुती हिंसाचाराच्या माध्यमातून छळ केला. पतीसोबत वास्तव्यास असताना पीडितेला होणारा शारीरिक आणि मानसिक छळ, तसेच सततचा भावनिक त्रास याची कल्पना करणे कठीण असल्याचंही न्यायालयाने म्हटलं आहे.

पतीने संपत्ती घेतल्याचं उघड झालं अन्...

एकीकडे, पीडितेची ही अशी अवस्था असताना दुसरीकडे 2012 मध्ये पतीने एक कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे पतीची आर्थिक स्थिती स्थिर असून तो पीडितेला भरपाईपोटी एक कोटी रुपये देण्यास सक्षम असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. तसेच न्यायालयाने भरपाईच्या रकमेत वाढ केल्याचं नमूद करताना वेळीच ही भरपाई द्यावी असंही नमूद केले.

Read More