Indian Share Market News: भारत-पाकिस्तानमधील शस्त्रविराम आणि थंडावलेल्या लष्करी कारवाया तसेच अमेरिका-चीनने व्यापार शुल्कात लक्षणीय घट करण्याचा करार जाहीर केल्याच्या परिणाम सोमवारी शेअर बाजारात दिसून आला. अनेक सकारात्मक गोष्टींमुळे गुंतवणूकदारांचा उत्साह, सेन्सेक्स आणि निफ्टी या प्रमुख निर्देशांकांनी एका सत्रातील सर्वात मोठी मुसंडी सोमवारी नोंदवल्याचं दिसून आलं. तब्बल पावणेचार टक्क्यांनी उसळलेल्या निर्देशांकांमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 16.15 लाख कोटींची भर पडली.
सकाळच्या सत्रामध्ये मोठी भरारी घेत व्यापार सुरु झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा 'सेन्सेक्स' सोमवारी बंद होताना 2.975.43 अंशांनी वधारुन 82 हजार 429.90 या सात महिन्यांच्या उच्चांकावर स्थिरावल्याचं दिसून आलं. दिवसभरातील सर्वोत्तम कामगिरीबद्दल बोलायचं झाल्यास सेन्सेक्सने 3,041.5 अंशांनी वाधला होता. सेन्सेक्सचा निर्देशांक 82,500 जवळ पोहोचला होता.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या म्हणजेच 'निफ्टी'च्या निर्देशांकाने 916.70 अंशांनी झेप घेत 24 हजार 924.70 पर्यंत मजल मारली. दिवसभरात या निर्देशांकानेही जवळपास 4 टक्क्यांच्या मुसंडीसह 24 हजार 944.80 च्या उच्चांकाला गाठले होते. शस्त्रविराम आणि दोन्ही देशांनी सर्व प्रकारच्या लष्करी कारवाया थांबविण्यासाठी दाखविलेल्या सहमतीचे सोमवारी भांडवली बाजाराने जोरदार स्वागत केले. यापूर्वी 3 जून 2024 रोजी सेन्सेक्स'ने 2,507.45 अंशांची आणि निफ्टीने 733.20 अंशांची एका दिवसातील सर्वाधिक वाढ नोंदवली होती.
माहिती-तंत्रज्ञान, वित्तीय सेवा, धातू, स्थावर मालमत्ता आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्सच्या खरेदीला जोर आल्याचं दिसून आलं. गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने एका दिवसातील सर्वोत्तम वाढ नोंदवली.
अमेरिकेतील औषधांच्या किमतीतील सुधारणांबाबत चिंतांमुळे केवळ औषधी क्षेत्रातील शेअर्स पडलेले दिसून आले. सेन्सेक्समधील सन फार्मा आणि इंडसइंड बैंक हे केवळ दोन कंपन्यांचे शेअर्स मागे राहिल्याचं दिसून आलं. व्यापक बाजारपेठेवरही तेजीवाल्यांची पकड दिसून आली आणि मिडकॅप आणि स्मॉलकॅप हे निर्देशांकही जवळपास 4 टक्क्यांनी उसळल्याचं दिसून आलं. आता पंतप्रधान मोदींनी सोमवारी सायंकाळी देशाला संबोधित केलं असून सुरक्षेसंदर्भात आस्वस्थ केलं आहे. त्यामुळे आज बाजारावर काय परिणाम दिसतो याकडे दिवसभर लक्ष राहणार आहे.