Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

16 लाख कोटी स्वाहा... तुम्हीसुद्धा Mutual Funds मध्ये Invsest केलं असेल तर काय करावं?

Indian Stock Market News: शेअर बाजारात मोठी पडझड होत असल्याने नेमकं काय करावं हे अनेकांना कळत नाहीये. त्यांच्यासाठी खास...

16 लाख कोटी स्वाहा... तुम्हीसुद्धा Mutual Funds मध्ये Invsest केलं असेल तर काय करावं?

Indian Stock Market News: जागतिक स्तरावर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे करयुद्धाला सुरुवात झाली आहे. या करयुद्धाचा फटका अमेरिकेलाही बसणार असून अमेरिकेतील मंदीच्या भीतीमुळे सोमवारी भारतीय शेअर बाजार 10 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर कोसळला. सोमवारी शेअर बाजारात व्यवहार सुरु झाल्यानंतर सुरुवातीच्या व्यवहारात भारतीय बाजार सुमारे 4 टक्क्यांनी घसरल्याचं पाहायला मिळालं. बीएसई सेन्सेक्स सुमारे 3 हजार अंकांनी घसरलेला. एनएसई निफ्टी 22 हजार अंकांच्या खाली होता. या साऱ्या घडामोडींमुळे गुंतवणूकदारांना 16 लाख कोटींचा फटका बसला. 

म्युच्युअल फंडमधील गुंतवणूकदारांनी काय करावे?

सध्याचं शेअर बाजारातील वातावरण पाहता तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना सावधपणे पावलं टाकण्याचा सल्ला दिला आहे. म्युच्युअल फंड एसआयपी सुरू करण्याची ही 'आदर्श वेळ' आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. "जागतिक स्तरावरील बाजारपेठा अत्यंत अनिश्चितता असल्याने फार अस्थिर अवस्थेत आहेत. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे निर्माण झालेली ही अशांतत पुढे कोणत्या मार्गावर जाईल याबद्दल कोणालाही कोणतीही कल्पना नाही. शेअर बाजाराच्या या अशांत टप्प्यात थांबा आणि वाट पाहा ही सर्वोत्तम रणनीती असेल," असं जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनीतिकार व्ही के विजयकुमार यांनी एका इंग्रजी वेबसाईटशी बोलताना सांगितलं.

दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची

"व्यापार शुल्कासंदर्भातील अनिश्चिततेच्या वाढत्या पार्श्वभूमीवर, बाजारातील अस्थिरता नजीकच्या काळात कायम राहण्याची अपेक्षा आहे. सध्याची स्थिती पाहता दीर्घकालीन गुंतवणुकीच्या संधी व्यवहार्य ठरतील," असं मास्टर कॅपिटल सर्व्हिसेसचे सहाय्यक उपाध्यक्ष (संशोधन आणि सल्लागार) विष्णू कांत उपाध्याय यांचं म्हणणं आहे. 

घाबरू जाण्याचं कारण नाही

मंदीच्या सततच्या भीतीमुळे, भारतीय गुंतवणूकदारांना अनेकदा सावध राहण्याचा सल्ला दिला जातो मात्र यामुळे घाबरू जाण्याचं कारण नाही. सध्याच्या बाजाराच्या परिस्थितीत गुंतवणूकदार म्हणून संतुलित दृष्टिकोन राखणे फार महत्त्वाचे आहे, असं व्हीएसआरके कॅपिटलचे संचालक स्वप्नील अग्रवाल यांनी सांगितलं. "दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी, निफ्टी ज्युनियर (निफ्टी नेक्स्ट 50) आणि निफ्टी ईटीएफ असे चांगले पर्याय उपलब्ध आहेत. मात्र यामध्ये काही अल्पकालीन अस्थिरता दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक सुरू करण्यासाठी सध्याचं वातावरण हे अत्यंत आदर्श आहे. या अस्थिरतेतून मार्ग काढण्यासाठी आणि कालांतराने स्थिरपणे संपत्ती निर्माण करण्यास आताची गुंतवणूक फायद्याची ठरु शकते," असं स्वप्निल यांनी म्हटलं आहे.

तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या

गुंतवणूकदारांनी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे, ट्रम्प यांनी लादलेले अविवेकी आयात कर शुल्क जास्त काळ टिकणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे भारताची अमेरिकेला होणारी निर्यात जीडीपीच्या टक्केवारीच्या जवळपास फक्त 2 टक्के इतकी असल्याने भारताची स्थिती इतर देशांच्या तुलनेनं फार चांगली आहे. त्यामुळे भारताच्या विकासावर या साऱ्या गोंधळाचा फारसा परिणाम होणार नाही. तिसरे अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे भारत अमेरिकेसोबत द्विपक्षीय व्यापार करारावर वाटाघाटी करत आहे आणि हा करार यशस्वी होण्याची शक्यता आहे ज्यामुळे भारतासाठी लवकरच कमी आयात कर जाहीर होऊ शकतील, अशी शक्यता विजयकुमार यांनी व्यक्त केली. 

(Disclaimer: येथे देण्यात आलेली माहिती स्टॉक्स ब्रोकरेजकडील आकडेवारीनुसार देण्यात आली आहे. तुम्ही अशाप्रकारे कोणत्याही पद्धतीची गुंतवणूक करु इच्छित असाल तर सर्वात आधी सर्टिफाइड गुंतवणुकदार सल्लागारांचा सल्ला घ्यावा. तुम्हाला कोणताही नफा किंवा तोटा झाल्यास झी 24 तास यासाठी जबाबदार राहणार नाही.)

Read More