ब्युरो रिपोर्ट, झी २४तास : कल्याणमध्ये मराठी मुलीला मारहाण करणा-या गुंड गोकुळ झाने मारहाणीनंतर फरार होऊन आपला लूक बदललल्याची माहिती समोर आली. पोलिसांच्या तावडीत सापडू नये य़ासाठी गोकुळने केस कापले होते. नेहमीसारखा पोशाख न करता टी-शर्ट परिधान केला होता. मात्र गोकुळचा हा प्लान फेल गेला आणि तो पोलिसांच्या तावडीत सापडला.
कल्याणमध्ये एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणा-या मराठी तरुणाला परप्रांतीय गोकुळ झा याने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. गोपाळ झा ला मनसैनिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. मात्र मारहाणीनंतर आणि अटक होईपर्यंतच्या काळात गोपाळ झा काय करत होता?....
आपला लूक बदलून गोकुळ झा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करत होता. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गोकुळ झा गायब झाला. घटनेच्या तब्बल 22 तासांनंतर गोकुळचा शोध लागला. पोलिसांसोबत मनसैनिकही गोकुळचा शोध घेत होते. गोकुळ झा मनसैनिकांच्या हाताला लागला आणि त्यांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं. याप्रकरणावरून आता राजकीय वर्तुळातही आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. मनसे नेते संदीप देशपांडेंनी नितेश राणे गप्प का ? आता हिंदू मुलीसाठी आवाज का उठवत नाहीत असा सवाल केला आहे.
आरोपी गोकुळ झा ला कल्याण सत्र न्यायालायत हजर करण्यात आलं. त्यावेळी कोर्टाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केलीये.गोकुळ झा ला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी गोकुळ झा रेकॉर्डवरचा आरोपी आहे त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. एका ट्रकचालकाला मारहाण केल्याप्रकरणी तो सध्या जामिनावर बाहेर होता. जामिनावर बाहेर असतानाही असा गुन्हा करण्याची आरोपीची हिंमत कशी झाली?, या घटनेनंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला नाहीये हे पुन्हा अधोरेखित झालं आहे.